पुरंदर
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Vajragad from Purandhar Machi
प्रस्तावना
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत, त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि.मी धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे, तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३ ते १४ मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला १९ - २० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे.किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे.गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे.एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत.गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
पुरंदर किल्ल्यावर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात फुल फूलतात. सप्टेंबर २०१३ मध्ये ट्रेक क्षितिज संस्थेने ८४ फुलांची नोंद केली यात काही दुर्मिळ फुल तर काही केवळ पुरंदरवर आढळणारी फुल आहेत.
सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो. वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सुचना वाचाव्यात.)
१) सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत.
२) सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते दिलेले फोटो आयडेंटी संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो.
३) किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारने कार्ड जवळ असणे आवश्यक आहे.
उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी.
४) पुरंदर गडावरील काही ठिकाणे (कंदकडा, केदार दरवाजा, बावची माची) सुरक्षेच्या कारणावरून तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत.
५) भैरवखिंड व वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.
६) कास पठारानंतर पुरंदर किल्ल्यावर रानफुलांच वैविध्य पाहायला मिळते. पुरंदरवरील फूल पाहाण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडावर जावे.
७) पुरंदर व मल्हारगड हे किल्ले २ दिवसात पाहाता येतात. मल्हारगड (सोनोरी किल्ल्याची ) माहिती साईटवर दिलेली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
अल्याड जेजुरी
पल्याड सोनोरी
मध्ये वाहते कऱ्हा
पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा ।
असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान अढळ आहे तसाच हा पुरंदर किल्ला. पुराणात या डोंगराचे नाव आहे ’इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत.
पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन हेमाडपंथी धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे. असे अनुमान निघते.
बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे त्यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला, त्यांनी पुरंदरच्या पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
इ. स १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले, म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव त्यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते.
‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी त्यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले तसेच बहिले मारले.‘
मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,
‘अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो‘ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?‘ म्हणोन नीट खानावरी चालिला खानावरी तलवरीचा वार करावा. तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला‘.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ’पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले त्र्यांची नावे अशी,
१ पुरंदर २ रुद्रमाळ किंवा वज्रगड
३ कोंढाणा ४ रोहीडा
५ लोहगड ६ विसापूर
७ तुंग ८ तिकोना
९ प्रबळगड १० माहुली
११ मनरंजन १२ कोहोज
१३ कर्नाळा १४ सोनगड
१५ पळसगड १६भंडारगड
१७ नरदुर्ग १८ मार्गगड
१९ वसंतगड २० नंगगड
२१ अंकोला २२ खिरदुर्ग (सागरगड)
२३ मानगड
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू त्यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
कसे पोहोचावे
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) सासवडहून सासवड - भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणार्या ’पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणार्या सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
२) पुण्याहून ३० किमी अंतरावर असणार्या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. नारायणपूर हे गाव तेथील एकमुखी दत्त मंदिरामुळे प्रसिध्द आहे. नारायणपेठ गावातून गाडी रस्ता नारायणपेठ या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावा मार्गे थेट किल्ल्या पर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपेठ गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडी रस्ता, या रस्त्याने आपण २ तासात मुरारगेट पाशी पोहोचतो. (खाजगी वाहानाने थेट मुरार गेट पर्यंत जाता येते) तर दुसरी वाट म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट, या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहचतो.
Via Saswad
A S.T. bus to Bhor from Saswad will drop you at the bus-stop of ‘Purandar Ghat matha’ in Narayanpur village. A road on the left side along the two houses situated on mountain ahead leads to Bini Darwaja which can be reached approximately in 45 minutes.
Via Pune
A S.T. bus to Saswad from Pune takes us to the foothills of Purandar fort. Pune-Narayanpur bus is also available to reach up to the base village, Narayanpur.
महत्त्वाची ठिकाणे
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
पुरंदर किल्ला :- या किल्ल्याला ३ माच्या (उत्तर, दक्षिण,बावची माची) आहेत. पुरंदरचा बालेकिल्ला ३ भागात (पूर्वेस कंदकडा, मध्यभागी राजगादी, पश्चिमेस केदारेश्वर) विभागलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नारायणपेठ गावातून डांबरी रस्ता व पायवाट आहे. डांबरी रस्त्याने आपण सैन्याने बनविलेल्या मुरारगेट या दरवाजापाशी पोहोचतो. तर पायवाटेने गडावर आल्यास आपण बिनी दरवाजापाशी पोहोचतो. दोन्ही मार्गाने गडावर प्रवेश केल्यास आपण पुरंदरच्या उत्तरेकडील माचीवर पोहोचतो. ही माची मुरारगेट ते भैरवखिंड अशी पसरलेली आहे. तर दक्षिणेकडील माची भैरवखिंड ते केदार दरवाजा अशी पसरलेली आहे. याखेरीज फत्ते बुरुजाखाली (केदार दरवाजाच्या पुढे खालच्या बाजूस) असलेल्या माचीस बावची माची म्हणतात.
मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर प्रथम "पद्मावती तळे" पाहायला मिळते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले चर्च आहे. चर्च वरून पुढे गेल्यावर "वीर मुरारबाजीचा पुतळा" आहे. (बिनीदरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यास उजवीकडे गेल्यावर वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो.) इ.स १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. पुतळच्या पुढे दुसरे चर्च आहे. चर्चच्या पुढे बिनी दरवाजा आहे.
बिनी दरवाजा :-
पुरंदर उत्तर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा कंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे पुरंदरेश्वर मंदिर, वज्रगडाकडे जातो, तर दुसरा रस्ता उजवीकडे वळून मुरारबाजी पुतळा, मुरारगेट कडे जातो.
आपण सरळ रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते. पुढे थोड्याच अंतरावर ’पुरंदरेश्वर’ मंदिर आहे. या मंदिराबाहेर एक चौकोनी विहिर आहे, तीला "मसणी विहीर" म्हणतात. या मंदिराजवळच कॅन्टीन आहे.
पुरंदरेश्वर मंदिर:-
हेमाडपंथी धाटणीचे हे महादेवाचे मंदिर आहे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपर्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते.
राजाळे तलाव व भैरवखिंड :-
पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यावर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. या तलावाच्या पुढे पुरंदर व वज्रगड यांच्या मधील भैरवखिंड आहे. याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याची ठाणी असल्यामुळे भैरवखिंड व वज्रगडावर जाता येत नाही.
पेशव्यांचा वाडा (सवाई माधवरावांचे जन्मस्थान) :-
पुरंदेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथाने हा वाडा बांधला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. आजही ती सुस्थितीत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने या वाटेने वर जातांना एक सुकलेले टाक पाहायला मिळते. या वाटेने १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो.
दिल्ली (सर) दरवाजा व गणेश दरवाजा:-
हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेची देवळी व हनुमानाची मुर्ती आहे. हा दरवाजा व त्याच्या बाजूचे बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो.त्याला " गणेश दरवाजा" म्हणतात. या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस "बावटा बुरुज" आहे. येथे ध्वज लावला जात असे.
या दरवाजातून बाहेर पडल्यावर तीन वाटा फुटतात. समोरची वाट राजगादी, केदार दरवाजा व केदारेश्वर मंदिराकडे जाते. उजवीकडची वाट राजगादी उजवीकडे व माची डावीकडे ठेवत शेंदर्या बुरुजापर्यंत जाते. तिसरी वाट डावीकडे वळून दरवाजा संकुलाच्या वरून कंदकड्याकडे जाते. (सन २०१३ मध्ये कंदकड्याला जाणारी वाट भारतीय सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.)
कंदकडा:-
दरवाज्यातून बाहेर येऊन डावीकडे गेल्यावर एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो, हाच तो कंदकडा. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे बुरुजा जवळ एक आणि वाटेवर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत. कंदकडा बुरुजावरून भैरवखिंड व वज्रगड व्यवस्थित पाहाता येतात.
कंदकडा पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून उजवीकडे जाणारी वाट पकडावी, ही वाट राजगादी उजवीकडे व माची डावीकडे ठेवत शेंदर्या बुरुजापर्यंत जाते.
शेंदर्या बुरूज व बोर टाक :-
पद्मावती तळ्याच्या मागे वरच्या बाजूस, बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधलेला आहे, त्याचे नाव शेंदर्या बुरूज. शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला अशी कथा आहे. या बुरुजाच्या पुढे एक कड्याच्या टोकाला एक पाण्याचे टाक आहे त्याला बोर टाक म्हणतात. येथून समोरच्या टेकडीवरील केदारेश्वर मंदिर दिसते.
राजगादी :-
शेंदर्या बुरुज व बोर टाक पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून समोर जाणारी वाट पकडावी. या वाटेवर कही वास्तूंचे चौथरे व दोन पाण्याची टाकं पाहायला मिळतात. पुढे या वाटेला दोन फाटे फुटतात. एक समोरच्या टेकडीवरील राजगादीवर जाते, तर दुसरी राजगादीला वळस घाकून केदारेश्वर मंदिराकडे जाते. आपण प्रथम समोरच्या टेकडीवर (राजगादी) जाणार्या वाटेने वर चढावे. येथे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर दारू खान्याची वास्तू आहे. थोडे वर चढून गेल्यावर आपण राजगादी टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. येथे उजव्या बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीच्या केदारेश्वरकडील टोकावर तटबंदीत बांधलेले शौचालय आहे. हे सर्व पाहून पुन्हा आल्या वाटेने खाली उतरून राजगादीची टेकडी उजवीकडे व दरी डावीकडे ठेऊन केदारेश्वर मंदिराच्या दिशेने जावे.
केदार दरवाजा :-
या वाटेवरून पुढे गेल्यावर एकाखाली एक असलेली पाण्याची टाकी लागतात. पुढे एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून १० मिनिटे चालत गेल्यावर केदार दरवाजा लागतो. या वाटेवर वरच्या बाजूस दोन पाण्याची टाकी आहेत. केदार दरवाजाच्या खालच्या बाजूस बावची माची आहे.. (सन २०१३ मध्ये केदार दरवाजा व बावची माचीला जाणारी वाट सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.) या दरवाच्या वरच्या बाजूस "फत्ते बुरुज" आहे.
केदारेश्वर :-
केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागून १५ मिनिटे चालून गेल्यावर राजगादी व केदारेश्वर मंदिर यांच्या मधील खिंडीत येतो. केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे.या रुंद जिन्याने आपण थेट केदारेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात.
मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर किल्ल्यावरील अत्युच्च टोकावर आहे. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे. त्याला "कोकण्या बुरूज" असे नाव आहे. केदारेश्वर मंदिराजवळ केदारगंगेचा उगम होतो.
संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात नारायणेश्वराच प्राचीन देऊळ पाहाण्यासारख आहे.
Bini Darwaja
The only door to Purandar Machi,enroute from Narayanpur as we approach Purandar fort. Unlike many other forts, the door is in good condition even today. As one enters through the door, there are provisions for the guards to hide and attack enemy. These are called as the Gatehouses. (Paharekaryandiya Devdya) As one proceeds further, the khandakada immediately catches our attention.
Once you enter through the door, the road branches, one straight ahead whereas the other towards the rear end of fort. As we move on, we come across the vintage military camps and a few bungalows. The same road leads to the foothills of the citadel, where we can see the temple of “Purandareshwar”. Also, the statue of Murarbaji in his fighting stance gives us the feel of his courageous nature and dose not fail taking us back to those glorious days.
Purandareshwar Temple
This is Lord Mahadev’s temple built in ‘Hemadic’ style of architecture. The temple houses approx. 1.25 to 1.5 feet high statue of Lord ‘Indra’. Senior Bajirao was instrumental in leading its reconstruction.
Rameshwar temple
This temple is located towards the rear end of Purandareshwar temple. Constructed during the start of ‘Peshva’ dynasty, built by Balaji Vishwanath, it was a temple that was privately owned by the Peshvas. Moving further ahead we come across the remains of an ancient two storied bungalow called as ‘Wada’.
It was in the same ‘Wada’ that Sawai Madhavrao was born. Behind it is a well, which is in a good condition even today. Moving further ahead, the road bifurcates, one that leads to the foothills of citadel whereas the other towards ‘Bhairav Khind’. As we move towards the road leading the citadel, after a walk of 15 minutes, we come across ‘Dilli Darwaja’.
Delhi Darwaja
This door, facing north, is still in a good condition. As the road turns near the Darwaja, we can see a temple of Goddess Laxmi. A leftward route from the bifurcation ahead leads us to the other end of the Citadel. The same road leads us to some water cisterns. The rightward road from the bifurcation leads to yet another door (Darwaja). Two statues of lions guard either sides of this Darwaja.
Khandakada
As we enter and proceed along this Delhi-Darwaja, we see a huge rock extending eastwards. This is nothing but ‘Khandakada’. At its end lies a bastion. After visiting this place, it is advisable to return to the Darwaja for our further journey towards the right end uphill. We get to see here the remnants of few structures like ‘food-grain storage rooms’ as also of a castle. A few water reservoirs are also located here. As we go ahead, we come across Kedar Darwaja. Although, it may not be in a good condition today, however, its historical value and importance can’t be overlooked.
Kedareshwar
As we walk for 15 minutes along the main road and climb the steps, we come across ‘Kedareshwar’ temple. A reconstructed temple, it is of Lord Kedareshwar. During Mahashivratri thousands of pilgrims visit this temple. ‘Deepastambha’, a stone pillar for enlightening the lamps, can be seen in front of the temple.
This temple is a topmost part of the fort. One can see the forts like Rajgad, Torna, Sinhagad, Raireshwar, Rohida, Malhargad as well as Karhe-Plateau from here. At the rear end of this temple there is a fortified place called as ‘Koknya’
Purandar Machi
Coming back up to Delhi Darwaja, one can take a straight route, which leads to ‘Purandar Machi’. We get to see many dilapidated remains along this route.
Bhairav Khind
Enroute to Purandar Machi, is the ‘Bhairavkhinda’. A statue of the Great Maratha, ‘Shivaji Maharaj’ can be seen here. On the right hand side we see the ‘Rajale lake’ which also the source of water supply for Purandar Machi.
Padmavati Lake
It can be seen if we walk just a little ahead of the great Murarbaji Deshpande statue.
Shendrya Bastion
There is bastion called SHENDRYA build in alignment with the fortification which is North-west to citadel & behind the Padmavati Lake.
Statue of Murarbaji Deshpande
The statue of Murarbaji Deshpande was established in 1970 to the right after we go through Bini Darwaja.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. नारायणपूर गावात राहण्याची सोय होते.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय आपण स्वत:
करावी. पुरंदेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या कॅन्टीन मध्ये चहा - नाश्त्याची सोय आहे.
पाणी उपलब्धता
गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
वन्यजीवन व वनस्पती
वनस्पती
सप्टेंबर अखेर पुरंदर किल्ल्यावर विविध जातीची रानफुले उगवतात. कास पठारानंतर पुरंदर किल्ल्यावर रानफुलांच वैविध्य पाहायला मिळते. त्यात काही दुर्मिळ जातीची, तर काही केवळ पुरंदरवरच आढळणारी फुले पण आहेत. पुरंदरवर आढळलेल्या 84 फुलांची शास्त्रोक्त यादी ट्रेक क्षितिजच्या सदस्यांनी बनवलेली आहे. हि यादी http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic177.html वर (Discussion board,- Flora & Fauna of Sahyadri) उपलब्ध आहे. आपण यात भर घालु शकता.
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा