साप गढी
प्रस्तावना
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील साप गावात सुस्थितीत असलेली गढी आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणासाठी या गढीचा वापर होत असल्याने गढी व्यवस्थित ठेवलेली आहे. गावातील लोक या गढीला राजवाडा म्हणून ओळखतात. सध्या ही गढी सरदार कदम यांचे वंशज इंद्रोजी कदम यांच्या मालिकीची आहे. त्यांच्या परवानगीनेच गढी पाहाता येते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
साप गावाला साप हे नाव कस पडले याची एक आख्यायिका आहे. सध्या हे गाव वसले आहे त्याठिकाणी पूर्वीच्या काळी जंगल होते. या जंगलात गुराखी आपली गुरे घेऊन जात असत . त्यातील एक गाय दुध द्यायची बंद झाली. गुराख्याने याचा शोध घेतल्यावर त्याला गाईचे दुध साप पित आहे असे दिसले. त्याजागी खोदल्यावर स्वयंभू पिंड सापडली. कालांतराने तिथे मंदिर बांधण्यात आले आणि त्याच्या आजूबाजूला गाव वसले ते साप या नावाने ओळखले जाऊ लागले. छ्त्रपती शाहू माहारांच्या काळात कदम घरण्याचा उदय आणि भरभराट झाली. त्याच काळात साप गावातील वाडा बांधण्यात आला होता. पुढील काळात पानिपतच्या युध्दात कदम यांनी शिंदे यांच्या बरोबर भाग घेतला होता. पानिपत युध्दानंतर कदम यांचे वंशज ग्वाल्हेर येथे स्थायिक झाले.
महत्त्वाची ठिकाणे
चौकोनी आकारात बांधलेल्या या गढीला एकूण ६ बुरुज आहेत . त्यापैकी चार बुरुज गढीच्या चार बाजूला आहेत, तर दोन बुरुज प्रवेशव्दाराच्या बाजूला आहेत. गढीची तटबंदी साधाअरणपणे १५ फ़ूटापर्यंत काळ्या दगडात बांधलेली आहे. त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी तटबंदीत जंग्या आणि झरोके ठेवलेले आहेत. गढीचे लाकडात बनवलेले प्रवेशव्दार सुस्थितीत आहे. प्रवेशव्दारावर लोखंडी खिळे बसवलेले आहेत. प्रवेशव्दारावर लाकडात बांधलेला नगार खाना आहे. प्रवेशव्दारात असलेल्या दिंडी दरवाजातून गढीत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. त्या देवड्यामधून नगारखान्यात आणि फ़ांजीवर जाण्यासाठी पायर्या आहेत. दरवाजा आणि दिंडी दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी लाकडी अडाणा दरवाजाच्या आलीत बाजूस आहे. हा अडाणा त्याच्या वरील नक्षिकाम असलेली लोखंडी कडी आजही सुस्थितीत आहे. गढीच्या आतल्या बाजूला तटबंदी लगत घोड्याच्या पागा होत्या. त्याच्या छपराचे वासे लावण्यासाठी तटबंदीत ठराविक अंतरावर खोबण्या ठेवलेल्या आहेत. खालील बाजूस घोडे बांधण्यासाठी असण्यार्या लोखंडी कड्या पाहायला मिळतात. गढीच्या मधल्या भागात एका मागे एक असे दोन एक मजली चौसोपी वाडे आहेत. लाकडात बांधलेल्या वाड्यात जाण्यासाठी चार दगडी पायर्या आहेत. त्याचढून गेल्यावर दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत. याठीकाणी वाड्याचे दफ़्तर होते. कदम यांच्या जहागिरीतील व्यवहार या कचेरीतून होत असे. वाड्याला सागवानी लाकडाचा दरवाजा आहे. तो ओलांडून वाड्यात प्रवेश केल्यावर वाड्यातील जूने सामान , संदुका, पितळी रांजण इत्यादी वस्तू पाहायला मिळतात. चौसोपी वाड्याच्या मधील भागातील अंगण दगडात बांधलेले आहे. अंगणाच्या चारही बाजूंना पाणी जाण्यासाठी गटार बनवलेले आहे. वाड्याच्या सर्व खोल्यां मधून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जीने आहेत. जीना चढून पहिल्या मजल्यावर गेल्यावर आपला रंगमहालात प्रवेश होतो. नक्षीदार खांब आणि कमानी असलेल्या खिडक्या असलेला हा सुंदर रंगमहाल सागवानी लाकडात बांधलेला आहे. रंगमहाल पाहून खाली उतरुन दुसर्या चौसोपी वाड्याकडे जातांना देवघर आहे. देवघराच्या पुढे मोठे स्वयंपाकघर आहे. त्यात जून्या काळातील भांडी पाहाता येतात. या ठिकाणी असलेल्या अंगणात तुळाशी वृंदावन आहे. वाडा पाहून बाहेर येउन वाडा आणि तटबंदी यांच्या मध्ये असलेल्या जागेतून वाड्याला बाहेरुन फ़ेरी मारतांना सर्व प्रथम एक तलाव पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला चूना बनवण्यासाठी असलेले दगडी जात पडलेल आहे. पुढे चालत गेल्यावर एक गोल विहिर आहे. विहिरीच्या पुढे तटबंदीत चोर दरवाजा आहे. तो सध्या दगड सिमेंट वापरुन बांधून काढलेला आहे. वाड्याच्या मागच्या बाजूला वाड्यात असलेल्या जून्या शौचालयाचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीही दोन ठिकाणी शौचालय आहेत. हे सर्व पाहून वाड्याच्या पुढच्या भागाकडे येतांना एक मोठा बांधीव तलाव पाहायला मिळतो. गढी आतून पाहून झाल्यावर प्रवेशव्दारातून बाहेर पडून उजव्या बाजूने गढीला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात करावी. याबाजूला शेतात एक प्रचंड मोठी चार मोटांची गोलाकार विहिर आहे. घडीव दगडात बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी सर्पिलाकार आकारात बनवलेल्या पायर्या आहेत. या पायर्यांच्या बाजूला शिलालेख आहे. या विहिरीवर चार मोटा बसवण्यासाठी केलेली रचना आणि दगडात बांधलेले पाण्याचे पाट पाहायला मिळतात. गढीला पूर्ण प्रदक्षिणा मारुन प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गढी पूर्णपणे पाहून होते. गढी पाहाण्यासाठी पाऊण तास लागतो. साप पासून १० किलोमीटर अंतरावर नांदोशी नावाचे गाव आहे. या गावात एक पडझड झालेली गढी आहे.
कसे पोहोचावे
सातारा ते रहिमतपूर हे अंतर २४ किलोमीटर आहे. रहिमतपूर गावापासून साप गाव ५ किलोमीटर अंतरावर आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गढीत राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय रहिमतपूर येथे होऊ शकते.
पाणी उपलब्धता
गढीमध्ये पिण्यासाठी पाणी नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️ वर्षभर
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.