तोरणा

गिरीदुर्ग पुणे डोंगररांग नाही
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
1400
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
पुणे

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
torna from the way of Rajgad to Torna

torna from the way of Rajgad to Torna

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

महत्त्वाची ठिकाणे

वेल्हे गावातून किल्ल्यावर जातांना प्रथम बिनी दरवाजा लागतो. या प्रवेशव्दारातून किल्ल्यावर चढत गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा कोठी दरवाजा लागतो. या दरवाजा जवळ तोरणजाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या पुढे दोन तलाव पाहायला मिळतात. या भागात घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. हे सर्व पाहून किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यावर समोरच मेंगाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या जवळच तोरणेश्वराचे मंदिर आहे. या भागातही घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. मंदिरांच्या मागच्या बाजूला खालच्या पातळीवर पाण्याची दोन टाकी आहेत.

तोरणा किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला किल्ल्याच्या झुंजार , बुधला आणि विशाळा या माच्यांवर जाता येते. मेंगाई मंदिराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला गड माथा पसरलेला पाहायला मिळतो. मेंगाई मंदिराच्या पूर्वेला असलेल्या झुंजार माचीकडे (बुरुजाकडे) जातांना वाटेत घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमे टोकावर असलेला झुंजार बुरुज पाहायला मिळतो. त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. बुरुजाच्या जवळ असलेल्या तटबंदीत गुप्त दरवाजा आहे. या दरवाजातून झुंजार माचीवर जाता येते.

तोरणा किल्ल्याची झुंझार माची पाहून पुन्हा मेंगाई देवीच्या मंदिरच्या जवळ येऊन पश्चिमेकडे चालायला सुरुवात करावी, हीच वाट पुढे राजगड किल्ल्याकडे जाते. या वाटेवर प्रथम कोकण दरवाजा लागतो. या प्रवेशव्दारातून बाहेर पडून पुढे चालत गेल्यावर हत्तीमाळ लागतो. या माळाच्या टोकावर हत्तीमाळ बुरुज आहे. बुरुजापासून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याची टाकी पाहायला मिळतात. टाकी पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला भगत दरवाजा आहे. या वाटेने पुढे पश्चिमेकडे चालत गेल्यावर वकंजाई दरवाजा आहे. या ठिकाणी दोन वाटा फ़ुटतात डावीकडे जाणारी वाट राजगड किल्ल्याकडे जाते. या वाटेवर एक पाण्याचे टाके आहे. तर सरळ जाणारी वाट बुधला माचीकडे जाते.

बुधला माची पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला चित्ता दरवाजा आहे. हा दरवाजा पाहून पुढे चालत गेल्यावर विशाळा माची आहे. या माचीच्या पुढे एक पाण्याचे टाक आहे . त्यापुढे किल्ल्याच्या पश्चिम टोकाला बुरुज आहे. हा पश्चिम टोका वरील बुरुज पाहून मेंगाई मंदिरापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

कसे पोहोचावे

पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ १) वेल्हेमार्गे अडीच तास लागतात. २) राजगड - तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

💧

पाणी उपलब्धता

मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

वेल्हे.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.