मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) किल्ल्याची ऊंची :  1950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: घोटवडा
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील घोटवडा किल्ला गोतारा, गुमतारा, दुगडचा किल्ला या नावांनी ओळखला जाणारा दुर्गम किल्ला आहे. कल्याणहून भिवंडी मार्गे वज्रेश्वरी- वसई कडे जातांना दुगड फ़ाटा लागतो. येथून रस्त्याच्या डाव्या बाजूला एक उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर घोटवडा हा दुर्लक्षित किल्ला आहे. तानसा नदीच्या खोर्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. शिवकाळा नंतर हा किल्ला ओस पडल्यामुळे किल्ला विस्मृतीत गेला. सद्यस्थितीत किल्ल्यावर जंगल वाढल्यामुळे गडावर जाण्याच्या वाटा दुर्गम झालेल्या आहेत. किल्ल्यावरील अनेक अवशेष जंगलात लुप्त झालेले आहेत. इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आजही निसर्गाशी झुंजत उभा आहे. किल्ल्यावर दुगड, मोहिली आणि उसगाव या किल्ल्याच्या डोण्गराच्या पायथ्याशी असलेल्या तीनही गावातून जाणार्‍या वाटा आहेत. पण या तीनही वाटांवर फ़ारसा वावर नाही, तसेच वाटेवर जंगल आणि गवत माजलेले आहे त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्या घेणे आवश्यक आहे.
14 Photos available for this fort
Ghotawada Fort (Gotara)
इतिहास :
शिलाहार काळापासून हा किल्ला अस्तित्वात असावा. शिवकाळात या किल्ल्याची डागडूजी करुन किल्ला वसवला. पेशव्यांच्या काळात वसई मोहिमेवर जातांना २४ मार्च १७३७ रोजी मराठ्यांनी माहुली किल्ल्यावरुन निघून घोटवाडा किल्ल्या खालच्या रानात मुक्काम केला. पण पाण्या अभावी त्यांचे हाल झाले होते.
पहाण्याची ठिकाणे :
घोटवडा किल्ल्यावर जाण्यासाठी कल्याण - वज्रेश्वरी रस्त्यावरील दुगड फ़ाटा गाठावा. या फ़ाट्यावरुन रस्ता थेट दुगड गावात जातो. दुगड हे गोतारा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून दोन तासात किल्ल्यावर जाता येते. परंतू येथून किल्ल्यावर जाण्यासाठी अंगावर येणारा चढ चढावा लागतो. दुगड रस्त्यावर दुगड गावाच्या अलिकडे मोहीली गावाला जाणारा रस्ता आहे. मोहिली हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या गावातून किल्ल्याच्या डोंगरापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटांची शेतातून पायपीट करावी लागते. येथून गडावर जाणारी वाट दाट झाडीतून जाते. ही वाट किल्ल्याला वळसा घालून वर चढत असल्याने या वाटेने किल्ल्याच्या माचीवर जाण्यास ३ तास लागतात. किल्ल्याच्या माचीवर घनदाट जंगल आहे. त्यावर कधीकाळी वास्तू असाव्यात पण आज त्या जंगलात हरवलेल्या आहेत. या माची व्यतिरिक्त दुगड गावाच्या बाजूला दुसरी माची आहे. या दोन्ही माच्या पायवाटेने जोडलेल्या आहेत.

माची वरुन समोर बालेकिल्ला दिसतो. बालेकिल्ल्याचा उभा चढ चढून १५ मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचा चढ चढतांना किल्ल्याची तटबंदी दिसते. त्या रोखाने चढत गेल्यावर किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशव्दारच्या बाजूचे बुरुज अजून शाबूत आहेत. पण दरवाजाची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाजाच्या आजूबाजूला अनेक कोरीव, घडीव दगड पडलेले आहेत. त्यात कमळाचे फ़ुल कोरलेला एक दगड आणि मशाल लावण्यासाठी गोल छिद्र केलेला एक पाहायला मिळतो प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच दगडात खोदलेले एक पाण्याचे कोरडे टाके आहे. तर उजव्या बाजूला ५ मिनिटे चालल्यावर ७ टाक्यांचा समुह आहे. त्यापैकी एकाच टाक्यात फ़ेब्रुवारीपर्यंत पाणी असते. बाकीची पाण्याची टाकी बुजलेली आहेत. पाण्याची टाकी पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन डावीकडे जाणारी वाट पकडावी . या वाटेवर एक सुस्थितीतला बुरुज आहे . या बुरुजा खालून जाणारी वाटेने पुढे गेल्यावर एक बारमाही वाहाणारा झरा आहे . हा झरा पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन बालेकिल्ल्यावर जाणार्‍या पायवाटेने थोडे चढल्यावर शेंदुर लावलेला एक दगड दिसतो. त्यावर त्रिशुळ आणि तलवार हातात घेतलेली प्रतिमा कोरलेली आहे. या मुर्तीच्या बजूला उध्वस्त वास्तूचे चौथरे आहेत. पायवाटेने पुढे गेल्यावर भग्न मुर्ती आहे. गावकरी देवीची मुर्ती म्हणून तिला पूजतात. बालेकिल्ल्यावर काही वास्तूंचे अवशेष आहेत. गडावरुन कामणदुर्ग, टकमक गड, तुंगारेश्वरचा डोंगर दिसतो.

किल्ल्यावर जाण्याची तिसरी वाट उसगावातून आहे. उसगावाच्या धरणाला वळसा मारून सरळ पुढे गेल्यावर एक लहान धबधबा लागतो. त्याला लागून एक पायवाट वर जाते. साधारणपणे १ तास चढल्या नंतर आपण गडाच्या खालच्या माचीवर पोहोचतो. पुढे चढून गेल्यावर आणखी दोन माच्या लागतात. तीन तासाच्या चढाई नंतर आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर बालेकिल्लावर पोहचतो.

पोहोचण्याच्या वाटा :
दुगड मार्गे :- घोटवडा किल्ल्यावर जाण्यासाठी कल्याण - वज्रेश्वरी रस्त्यावरील कल्याणपासून ३२ किलोमीटरवर असणारा दुगडफ़ाटा गाठावा. दुगड फ़ाट्यावरुन किल्ल्याच्या पायथ्याचे दुगड गाव ४ किलोमीटरवर आहे. दुगड गावातून तीव्र चढ चढून २ ते ३ तासात किल्ल्यावर पोहोचता येते.

मोहिली मार्गे :- दुगड फ़ाटा ते दुगड रस्त्यावर डाव्या बाजूला एक रस्ता मोहिली या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात जातो. दुगडफ़ाटा ते मोहिली अंतर ४ किलोमीटर आहे. मोहीली गावातून किल्ल्याच्या डोंगरापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटांची शेतातून पायपीट करावी लागते. येथून गडावर जाणारी वाट दाट झाडीतून जाते. ही वाट किल्ल्याला वळसा घालून वर चढत असल्याने या वाटेने किल्ल्याच्या माचीवर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.

उसगाव मार्गे :- घोटवडा किल्ल्याच्या पायथ्याचे तिसरे गाव उसगाव आहे. गावाच्या पुढे धरण आहे. कल्याण - वज्रेश्वरी - उसगाव धरण हे अंतर ४२ किलोमीटर आहे. उसगावाच्या धरणाला वळसा मारून सरळ पुढे गेल्यावर एक लहान धबधबा लागतो. त्याला लागून एक पायवाट वर जाते. या वाटेने किल्ल्याच्या माचीवर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
मोहाली गावात नाश्त्याची व जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी एकाच टाक्यात फ़ेब्रुवारी पर्यंत असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून ३ ते ४ तास लागतात
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: G
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोवा किल्ला (Goa Fort)
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)