मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गोपाळगड (Gopalgad) किल्ल्याची ऊंची :  300
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
प्राचिनकाळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर (दाल्भेश्वर) पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या (खाडी) किनारी अंजनवेलचा किल्ला (गोपाळगड) बांधण्यात आला. मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून किल्ला वाढवला, मजबूत केला.




Gopalgad
25 Photos available for this fort
Gopalgad
Gopalgad
Gopalgad
इतिहास :
हा गड कोणी व कधी बांधला याचा इतिहास ज्ञात नाही. इ.स १६६० च्या दाभोळच्या स्वारीच्यावेळी शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली व किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये हबशी सरदार खर्यातखान याने किल्ला जिंकला व पुढील ४६ वर्षे तो त्याच्या ताब्यात होता. याच काळात किल्ल्याचा पडकोट बांधण्यात आला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर ह्यांनी १७५६ मध्ये किल्ला जिंकला. पानिपतच्या युध्दानंतर सदाशिव भाऊंचा तोतया बनून आलेल्याने ६ महीने किल्ला स्वत:कडे ठेवला. त्यानंतर मात्र १८१८ पर्यंत तो मराठ्यांकडे राहीला. इंग्रज कर्नल केनडी याने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. अंजनवेल गावातून किल्ल्याजवळील पठारापर्यंत (सड्या पर्यंत) गाडीने जाता येते. ह्या रस्त्याने आपण किल्ल्याला वळसा घालून पश्चिमेकडच्या तटबंदीतील छोट्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्याच्या जमिनीकडील बाजूला खोल खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. (तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता पण आता तो अत्सित्वात नाही). गडाच्या पूर्वेला एक दरवाजा आहे. गडाचा तट ७ मीटर उंचीचा व २५ मीटर रुंदीचा आहे. हा गड वरचा कोट, बालेकोट व पडकोट ह्यांचा मिळून बनलेला आहे. पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनार्‍यापर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी , १६९९ मध्ये सिध्दी खैरतखानाने बांधली. तुळाजी आंग्रे ह्यांनी किल्ल्यालगतचा बालेकोट बांधला. परकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. त्याच्या बाजूस चोर दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच एक खराब पाण्याचं टाकं आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने शिरण्यासाठी दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर बालेकोटा पर्यंत तटाबुरूजांचे बांधकाम आज भग्नावस्थेत आहे. या परकोटामध्ये ही चोरदरवाजाच्या जवळ खराब पाण्याचं टाकं आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. ह्या व्यतिरीक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, त्याजवळील बांधीव तलाब आणि छोटी-मोठी घरांची जोती असे अवशेष दिसतात. गडाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात खोदलेली पायर्‍यांची विहीर आहे. या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य होते. महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे गोपाळगड खाजगी मालमत्ता बनलेला आहे. त्यामुळे गडांचा दरवाजांना कुलुप लावलेली आहेत. पण त्याची पर्वा न करता गड बघावा. या अतिक्रमणाविरूद्ध दूर्गप्रेमींचा कायदेशीर लढा चालू आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ते गुहागर हे अंतर साधारण २७० कि.मी आहे. गुहागरहून १४ कि.मी वर अंजनवेल गावात गोपाळगड उर्फ अंजनवेलचा किल्ला आहे. किल्ल्याजवळील पठारापर्यंत (सड्या पर्यंत) गाडीने जाता येते. गुहागरहून बसने आल्यास अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. अंजनवेल व गुहागर येथे रहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. अंजनवेल व गुहागर येथे जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: G
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोवा किल्ला (Goa Fort)
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)