अकोला किल्ला (असदगड)
(Akola Fort (Asadgad Fort)) |
किल्ल्याची ऊंची : 
0 |
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : अकोला |
श्रेणी : सोपी |
मुंबई नागपूर लोहमार्गावर असलेले अकोला हे गाव मध्ययुगीन काळापासून महत्वाचे ठिकाण होते. मोरणा नदीच्या किनारी वसलेले अकोला गाव मोगलांच्या काळात एक परगणा होता. अशा राजकीय आणि महसुलाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गावाच्या रक्षणासाठी गावाला तटबंदी आणि बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या नगर कोटाचे मुळ नाव असदगड होते, पण आता तो अकोल्याचा किल्ला या नावाने ओळखला जातो.
अकोला किल्ला, गोंधनपूर किल्ला, बाळापूर किल्ला, लासूर गढी ही ठिकाणे शेगाव येथे मुक्काम करुन खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.
|
|
इतिहास : |
औरंगजेबने अकोला परगणा (गाव) आपला दिवाण असदखान याला बक्षीस म्हणून दिले होते . इ. स. १६९० मध्ये ख्याजा अब्दुल लतीफ याच्या देखरेखी खाली अकोला गावाच्या चारही बाजूस तटबंदी आणि बुरुज बांधून गाव संरक्षित करण्यात आले होते. असदखानाच्या नावावरुन किल्ल्याला असदगड किल्ला म्हणून ओळखले जात होते. एका दंतकथेनुसार अकोलसिंग नावाच्या राजपूत सरदाराने अकोला शहर व हा किल्ला बांधला.
|
पहाण्याची ठिकाणे : |
मोरणा नदीकाठी वसलेल्या अकोला किल्ल्याला तटबंदी आणि बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. यात असद बुरुज, पंच बुरुज आणि अगरवेस बुरुज असे तीन मोठे बुरुज होते. तसेच या किल्ल्याला विविध दिशांना प्रवेशव्दारे होती. त्यांना बाळापूर वेस, असद वेस इत्यादी नावाने ओळखले जात असे. आज अकोला किल्ला त्याची प्रवेशव्दारे आणि तटबंदी नष्ट झालेली आहे. किल्ल्यात मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने किल्ल्याचा एकमेव अवशेष असलेला बुरुज आपल्याला मोरणा नदीकाठी असलेल्या टेकडीवर पाहायला मिळतो.
अकोला शहराच्या जुन्या अकोला पोलिस स्टेशनच्या बाजूला किल्ल्याची उरलेली तटबंदी आणि दोन बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजाच्या बाजूने पायर्यांची वाट टेकडीवर जाते . टेकडीवर महापालिकेने एक उद्यान बनवलेले आहे. त्याची अवस्था अतिशय खराब आहे. उद्यानाच्या फ़ाटका समोर एक पुष्कर्णी आहे. डाव्या टेकडीच्या एका टोकाला भव्य भग्न बुरुज आहे. या बुरुजात हवा महल बांधलेला होता. या दुमजली हवा महालाचे नक्षीदार झरोके आणि खिडक्या आजही पाहायला मिळतात. या खिडक्यातून मोरणा नदीचे पात्र दिसते. किल्ल्याचा हा एकमेव अवशेष आज कसा बसा तग धरुन उभा आहे. त्या बुरुजाची तटबंदी कधीच नष्ट झालेली आहे. याशिवाय किल्ल्याचे कुठलेही अवशेष पाहायला मिळत नाहीत.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
अकोला हे मुंबई नागपूर लोहमार्गावर असलेले महत्वाचे स्थानक आहे. तसेच ते रस्त्यानेही सर्व शहरांशी जोडलेले आहे. रिक्षाने अथवा खाजगी वहानाने जुने अकोला पोलिस स्टेशन जवळ उतरल्यावर पोलिस स्टेशनच्या बाजूलाच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. |
राहाण्याची सोय : |
राहाण्याची सोय अकोला शहरातील हॉटेल्स मध्ये आहे. |
जेवणाची सोय : |
अकोला शहरात जेवणासाठी अनेक हॉटेल्स आहेत. |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
बुरुजावर जाण्यासाठी १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |