गोंधनपूर किल्ला
(Gondhanpur Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
0 |
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : बुलढाणा |
श्रेणी : सोपी |
श्री गजानन महाराजांमुळे प्रसिध्द असलेले शेगावपासून २५ किलोमीटर अंतरावर गोंधनपूर गावात एक छोटासा किल्ला आहे. तसेच गावाबाहेर असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराजवळ एक बारव आहे. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
गोंधनपूर किल्ल्याला दोन तटबंदी आहेत. गोंधनपूर गावातील बालाजी मंदिरा समोर किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीचे प्रवेशव्दार आहे. हे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार १० फ़ूट उंचीचे असून ते भाजलेल्या वीटांनी बांधलेले आहे. या वीटांनीच त्यावर नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला वीटांनी बांधलेले दोन भव्य बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीचा आकार चौकोनी असून प्रवेशव्दाराच्या बाजूला असलेल्या दोन भव्य बुरुज व्यतिरिक्त चार टोकाला चार बुरुज आहेत. या तटबंदीच्या आत आणि बाहेर दाट वस्ती आहे . त्यामुळे बाहेरील तटबंदी आणि उरलेले चार टोकाचे चार बुरुज त्यात लुप्त झालेले आहेत.
प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या बालेकिल्लात जांण्यासाठी दाट वस्तीतून जाणार्या सिमेंटच्या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक वाट बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे जाते. बालेकिल्ल्याला एकुण ६ बुरुज आहेत . २० फ़ूट उंच असलेले हे बुरुज आणि तटबंदी दगडांनी बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार १२ फ़ूट उंचीचे असून ते दगडांनी बांधलेले आहे . त्यावर भाजलेल्या वीटांनी बांधलेला नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. आतल्या बाजूला इंग्रजी "L" आकारात केलेले दगडी बांधकाम आहे. या बांधकामाच्या खालच्या बाजूला तळघर आहे. त्यात जाण्यासाठी २.५ फ़ूट उंचीच्या दगडी कमानी आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला भिंतीत काही खोल्या आहेत. त्यातील शेवटच्या खोलीत विहिर असावी त्यात वटवाघुळांचा वावर असल्याने जवळ जाता येत नाही. किल्ल्याच्या या भागाचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी होत असावा.
बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या काटकोनात दुसरे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार २० फ़ूट उंचीचे असून कमानी पर्यंतचा १२ फ़ूटाचा भाग घडीव दगडांनी बांधलेला असून त्यावर दोन मजली भाग विटांनी बांधलेला आहे. प्रवेशव्दारावर दोन कमळाची फुले कोरलेली आहेत. त्यावर असलेल्या भागात वीटांनी नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशव्दारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावरउजव्या बाजूला फ़ांजीवर जाण्यासाठी दगडी जीना आहे. या जीन्याने फ़ांजीवरुन फ़िरताना बालेकिल्ल्याच्या चार बाजूला असलेल्या चार बुरुजांवर जाता येते. बुरुज आणि फ़ांजी दगडांनी बांधलेली आहे. त्यावरील तटबंदी मात्र भाजलेल्या वीटांनी बांधलेली आहे. त्या बांधकामात जागोजागी जंग्या आणि झरोके ठेवलेले आहेत.
फ़ांजीवरुन फ़ेरी मारुन खाली उतरल्यावर मधल्या भागात असलेल्या पुष्कर्णीच्या दिशेने जावे. ही पुष्कर्णी पाहून डाव्या बाजूच्या बुरुजाच्या दिशेने गेल्यावर बुरुजाखाली एक खोल विहिर आहे. फ़ांजी खाली असलेल्या भिंतीत कमानदार दरवाजा असलेल्या छोट्या छोट्या खोल्या पाहायला मिळतात. हे सर्व पाहून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
श्री गजानन महाराजांमुळे प्रसिध्द असलेले शेगाव हे मुंबई नागपूर लोहमार्गावर असलेले महत्वाचे स्थानक आहे. शेगाव ते गोंधनपूर अंतर २५ किलोमीटर आहे. शेगावहून खाजगी वहानाने लासूरची गढी, खामगावच्या किल्ल्याचे एकमेव प्रवेशव्दार आणि तसेच गोंधनपूर गावाबाहेर असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराजवळ असलेली बारव ही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. |
राहाण्याची सोय : |
राहाण्याची सोय शेगाव येथे आहे.
|
जेवणाची सोय : |
शेगाव शहरात जेवणासाठी अनेक हॉटेल्स आहेत. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |