मधुमकरंदगड

गिरीदुर्ग सातारा महाबळेश्वर
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
4050
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
सातारा

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Madhu makarandgad

Madhu makarandgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

महाबळेश्वरच्या मुंबई पॉईंट वरुन सुर्यास्त पाहाताना तो घोड्याच्या पाठीवरच्या खोगीरी सारख्या दिसणाऱ्या (" Saddle back") डोंगराच्या मागे होतो . हा डोंगर म्हणजेच मधुमकरंदगड . मधु आणि मकरंद हे जोड किल्ले पूर्व - पश्चिम पसरलेल्या डोंगरारांगेवर वसलेले आहेत. यातील पूर्वेकडील शिखरावर मकरंदगड आणि पश्चिमेकडील शिखरावर मधुगड आहे .

मधुमकरंद गडाच्या पायथ्याशी असलेल्या हातलोट गावातून कोकणातील बिरमणी (जिल्हा रत्नागिरी) या गावात उतरणाऱ्या प्राचीन हातलोट घाटाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती .

मधुमकरंदगड गडाच्या माचीवर घोणसपूर हे गाव आहे. गावात जंगम लोकांची वस्ती आहे. हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. या गावात मांसाहार करु नये असा फलक मंदिराजवळ लावलेला आहे.

मधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे .

महत्त्वाची ठिकाणे

मधु-मकरंद गडाच्या माचीवर घोणसपूर हे गाव आहे. या गावात येण्यासाठी दोन वाटा आहेत . एक चतुर्बेट गावामार्गे आणि दुसरी हातलोट गावामार्गे आहे . या दोन्ही वाटांनी आपण घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराजवळ काही झिजलेल्या वीरगळी आणि सतीचा हात पाहायला मिळतात . मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूने चढत जाणारी पायवाट मकरंदगड किल्ल्यावर जाते . डोंगराच्या धारेवरुन चढणाऱ्या या वाटेने १५ मिनिटाचा खडा चढ चढल्यावर आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले होते. त्यामुळे या प्रवेशव्दाराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले होते . प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाते . या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण मोठ्या खांब टाक्यापाशी पोहोचतो . या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही .

खांबटाके पाहून आलो त्या मार्गाने परत जाताना खांबटाक्या जवळच गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या ठिकठिकाणी मोडलेल्या आहेत त्यावरुन जपून चढत गड माथ्यावर पोहोचण्यास ५ मिनिटे लागतात. गड माथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरा बाहेर उघड्यावर नंदी आहे . मंदिराच्या समोरच्या बाजूला एक उध्वस्त वास्तूचा चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर वास्तूचे दगड वापरुन एक समाधी बनवलेली आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत .


मकरंदगडावरुन महाबळेश्वरचा डोंगर , चकदेव , पर्वत , मधुगड , रसाळ सुमार आणि महिपतगड हे किल्ले दिसतात .

मकरंदगडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी मळलेली वाट आहे . या वाटेने उतरतान मध्ये एक वेगळा दगड पाहायला मिळतो . पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे या दगडाची झीज होवून त्यातून आरपार बोगदा तयार झालेला आहे . येथून खाली उतरल्यावर आपण गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो . या ठिकाणी आधी आपण उजवीकडे वळून टाक्याकडे गेलो होतो . आता डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसते . याच पायवाटेने मधू गडावर जाता येते . मधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे . मधु गडावर एक मोठे पाण्याचे टाके आहे .

कसे पोहोचावे

मधु-मकरंद गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत .

१) चतुर्बेट मार्गे :- महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव ३७ किलोमीटर अंतरावर आहे . महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो याठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर , पार असे यावर लिहिलेले आहे. हा रस्ता थेट चतुर्बेट गावापर्यंत जातो . गावाच्या पुढे घोणसपूरला जाणारा कच्चा रस्ता आहे . चार किलोमीटरच्या रस्त्यावरून जीप किंवा बाईक सारखे वाहन थेट घोणसपूर या किल्ल्याच्या माचीवरील गावात जाऊ शकते .

महाबळेश्वरहून चतुर्बेटला जाण्यासाठी एसटी बस आहेत .
महाबळेश्वर - वाळण - १८. ०० ,
महाबळेश्वर - खरोशी - १५ .००
महाबळेश्वर - दुधगाव १४ . ३० आणि १७.०० मुक्कामी

या एसटी बसने घोणसपूर फाट्यावर उतरुन रस्त्याने चालत घोणसपूर गावात जाण्यासाठी २ तास लागतात . घोणसपूर गावातून मल्लिकार्जुन मंदिराजवळून गडमाथ्यावर जाण्यास पाउण तास लागतो .

२) हातलोट मार्गे :- महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव ३७ किलोमीटर अंतरावर आहे . महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो याठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर , पार असे यावर लिहिलेले आहे. हा रस्ता थेट हातलोट गावापर्यंत जातो . (चतुर्बेट गावाच्या अलीकडे हातलोटचा फाटा आहे.) हातलोट गाव संपल्यावर डाव्या बाजूला ओढ्यावर पूल आहे . हा पूल ओलांडून घरांच्या मधून चढत गेल्यावर आपण १० मिनिटात सपाटीवर येतो . येथेच किल्ल्यावर जाणारी ठळक वाट आहे . दाट जंगलातून जाणाऱ्या यावाटेने आपण दिड ते दोन तासात घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो . मंदिरापासून अर्ध्यातासात गडमाथ्यावर पोहोचता येते .

महाबळेश्वर - हातलोट एसटी संध्याकाळी ५ वाजता महाबळेश्वरहून सुटते. ती मुक्कामी हातलोटला असते. सकाळी ७ वाजता महाबळेश्वरला जाते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ हातलोट मार्गे दिड ते दोन तास, चतुर्बेट मार्गे २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

मल्लिकार्जुन मंदिरात २० जणांची राहाण्याची सोय होते.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची व्यवस्था नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्या योग्य पाणी नाही. घोणसपूर गावात आहे .

सर्वोत्तम काळ

🌤️ पावसाळा सोडून वर्षभर .

जवळील गावे

चतुर्बेट , हातलोट

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.