मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हिराकोट (Hirakot) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
मुंबईशी जवळीक असल्यामुळे, परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्यासाठी अष्टआगारात मराठ्यांनी खूप किल्ले बांधले. त्यापैकीच एक अलिबागचा हिराकोट. १७२० मध्ये कान्होजी आंग्रे यांनी काळ्या पाषाणाच्या मोठमोठाल्या घडीव शिळा रचून या किल्ल्याच्या विशाल भिंती आणि बुरुज बनवून घेतले. हा किल्ला समुद्र किनार्याजवळ जमिनिवर असल्यामुळे, त्या काळमध्ये अलिबागमधली ही सर्वात मोठी वास्तू होती. सद्यकाळातही हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात असल्यामुळे तो आतून पाहणे शक्य नाही. बाहेरून फक्त किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजाच दिसतो.

5 Photos available for this fort
Hirakot
इतिहास :
हिराकोटचा इतिहास हा फार रोचक आहे. सरखेल कान्होजी आंग्रेंनी १७२० मध्ये हा किल्ला बांधला. त्यांच्या पश्चात १७४० मध्ये मानाजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांच्यात युद्ध झाले. यावेळी फक्त २० वर्षांचे असलेले बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे मानाजींकडून लढले होते. त्यांनी हिराकोटवर हल्ला करून संभाजीच्या सैन्याला मागे लोटलं होत. यात २५-३० सैनिक मारले गेले होते व तुळाजी जे संभाजींचे भाऊ होते त्यांना बंदी बनवण्यात आले होते. या धामधुमीत एके दिवशी बाजीरावसाहेबांचा नर्मदेकाठी रावेरखेडी येथे मृत्यू झाला आहे ही बातमी दूताकरवी हिराकोटातील नानासाहेबांना मिळाली आणि हिराकोटात जाताना पेशवापुत्र असणारे बाळाजी बाजीरावराव हिराकोटातून बाहेर पडले ते पेशवा होण्यासाठीच. १८४० पर्यंत हिराकोट आंग्रे संस्थानाकडेच राहिला व पुढे कुलाब्यासोबत हा किल्लाही इंग्रजांकडे गेला.

ब्रिटिशांच्या काळात कुलाबा जिल्ह्यात २ कारागृह होती. कारावासाच्या कालावधीप्रमाणे १ महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी हिराकोट आणि १५ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी महाड येथील तुरुंग वापरले जात. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठाण्याच्या जेलमध्ये पाठवले जाई. हिराकोटमध्ये एका वेळी ७६ कैद्यांना ठेवण्याची क्षमता होती. आतमध्ये ८ कोठड्या होत्या ज्यातील ५ या १८१३ फूट तर ३ या १७११ फुटाच्या होत्या. महिला कैद्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवले जाई. १८८१-८२ मध्ये दररोज सरासरी ११ कैदी येथे ठेवलेले असायचे. येथील आरोग्यविषयक गोष्टीचा उल्लेख कुलाबा गॅझेटमध्ये करण्यात आला आहे. येथे १८७४ ते १८८० या काळात एकही कैदी दगावला नाही अशी नोंद आहे. सद्यकाळातही हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात असल्यामुळे तो आतून पाहणे शक्य नाही. बाहेरून फक्त किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजाच दिसतो.
पहाण्याची ठिकाणे :
हिराकोटला ६ बुरुज आहेत. दक्षिणेला किल्ल्यात जाण्यासाठी तीव्र चढणाच्या मोठया पायऱ्या आहेत. वर चढून जाताच दरवाज्याजवळ उजवीकडे मारुतीची मूर्ती आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या असून त्याच्याच वर नवीन शैलीचे बांधकाम असलेले ऑफिस आहे. उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भिंतींना लागून कैद्यांच्या कोठड्या आहेत. पश्चिमेकडे खजिना ठेवण्यासाठी सोय केलेली आहे. किल्ल्याच्या आत एक जुनी विहिर आणि कालिंबिका/काळंबा देवीचे मंदिरही आहे. असे म्हटले जाते की देवीने थळ जवळच्या समुद्रात असल्याचा दृष्टांत दिला होता. त्याप्रमाणे येथील कोळी बांधवांनी समुद्रात शोध घेतला तेव्हा जाळ्यात काळंबादेवीची रेखीव पाषाणी मूर्ती सापडली. कान्होजी आंग्रेंनी त्यांची कुलस्वामिनी कालिंबिका देवीची या किल्ल्यामध्ये विधीवत स्थापना करून मंदिर बांधले. किल्ल्यात आजही हे मंदिर आहे. पण ब्रिटिशांच्या काळात या किल्ल्याचा कारागृह म्हणून वापर होऊ लागला, त्यावेळी देवीची अलिबागच्या तत्कालीन सीमेवर म्हणजे आत्ताच्या बालाजी नाक्यावर प्रतिष्ठापना करण्यात आली. बालाजी नाक्यावरील मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार झाला असल्याने संपूर्ण मंदिराला आधुनिक रूप मिळाले आहे. मंदिर परिसरात बर्याच जुन्या मूर्ती आणि विरगळी बघायला मिळतात. येथे दर वर्षी नवरात्रात जत्रा भरवली जाते. असे म्हटले जाते की ही जत्रा/उत्सव भरवण्याची पद्धत देवी, हिराकोटमध्ये असल्यापासून सुरू आहे.

हिराकोट जरी लहानसा किल्ला असला तरी भौगोलिक दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. कुलाबा गॅझेटनुसार, हिराकोट कधी शत्रूच्या ताब्यात गेला तर येथे तोफा लावून अलिबागच्या किनाऱ्यासमोरील बेटावर असणाऱ्या कुलाबा किल्ल्याला लक्ष्य बनवले जाऊ शकत होते. हे लक्षात घेऊनच कुलाब्याचा महादरवाजा तोफांपासून संरक्षित ठेवण्यासाठी सर्जेकोट बांधण्यात आला. सर्जेकोटावर वसाहती नव्हत्या. तर सर्जेकोट फक्त पाहऱ्यासाठी आणि महादरवाजकडे येणाऱ्या तोफगोळ्यांपासून संरक्षणासाठी बांधला गेला होता. आजही गुगल मॅपमध्ये, कुलाबा, सर्जेकोट आणि हिराकोट एका सरळ रेषेत असल्याचे सहज पडताळता येते.

हिराकोट किल्ल्याच्या मागे एक विस्तीर्ण मैदान आहे. तेथून पाहिल्यास या किल्ल्याची भव्यता दिसून येते. सध्या या मैदानाचा वापर पोलीस ग्राउंड म्हणून होतो. किल्ल्याच्या समोरच लंबवर्तुळाकार तळं आहे, ‘हिराकोट तळ‘. नजीकच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी दगड माती काढल्याने हे तळे निर्माण झाले होते. सध्या तळ्याच्या चारही बाजूला विविध शासकीय कार्यालये आणि शासकीय निवासस्थाने आहेत. यात रायगड जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थान, रायगड जिल्हान्यायालय, तलाठी – तहसीलदार कार्यालये यांचा समावेश आहे. यातील बर्याचश्या इमारती ब्रिटिश काळातील असून. त्याकाळातल्या स्थापत्य शैलीच्या खुणा सहज पाहता येतात. हिराकोटच्या जवळच भारतातील अग्रगण्य भूचुंबकीय वेधशाळा आहे. या वेधशाळेची स्थापना १९०४ मध्ये करण्यात आली असून सद्यकाळातहि वेधशाळेच्या आवारात दोन ऐतिहासिक इमारतींमध्ये प्रत्येकी एक मॅग्नाटोमीटर कार्यंवित आहे. काही वर्षापूर्वी केलेल्या सुशोभीकरणामुळे हिराकोट तळ्याचे सौंदर्य अजूनच खुलून आलेले आहे. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी किंवा शांततेत बसून या ठिकाणची ऐतिहासिकता अनुभवण्यासाठी ही खूप छान जागा आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
अलिबाग बस स्टॅन्डपासून १५-२० मिनिटे चालत किंवा रिक्षाने जात येते.
राहाण्याची सोय :
अलिबाग किनार्याच्या रस्त्यावर पर्यटकांसाठी अनेक निवाऱ्याच्या सोयी आहेत.
जेवणाची सोय :
शासकीय कार्यालयांमुळे हिराकोट जवळ अनेक उपाहारगृहे आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर कधीही जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: H
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 हिराकोट (Hirakot)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)