होन्नुर किल्ला
(Honnur Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
2400 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : बेळगाव |
श्रेणी : मध्यम |
बेळगाव जिल्ह्यात हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे . धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे लाल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे . या दरवाजाच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे . प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे . किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही . किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही . किल्ला पाहाण्यासाठी १५ मिनिटे पुरतात .
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई - बंगलोर महामार्गावर , बेळगावहून मुंबईला जातांना ३७ किलोमीटरवर हिडकल डॅमला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्य़ा पासून १२ किलोमीटरवर उजवीकडे विठ्ठल भवन सर्किट हाऊसला जाणरा फ़ाटा आहे. होन्नुर किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही . |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |