मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अणघई (Anghai) किल्ल्याची ऊंची :  1350
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अणघई
जिल्हा : पुणे श्रेणी : अत्यंत कठीण
रायगड जिल्ह्यात जांभूळपाड्या जवळ मृगगड आणि अणघई हे दोन किल्ले आहेत. या भागातून सव आणि निसणी या दोन घाटवाटा जातात. या घाटवाटांवर आणि अंबा नदीच्या खोर्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी मृगगड आणि अणघई या दोन किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे टेहळणीचे किल्ले असल्याने त्यावर फ़ारसे अवशेष नाहीत.

अणघई किल्ल्याचे पायथ्याचे गाव कळंब हे रायगड जिल्ह्यात येत असले तरी अणघई किल्ला आणि डोंगररांग मात्र पुणे जिल्ह्यात येत. कळंब व आजूबाजूच्या गावातले काही माणसे ही डोंगरांग ओलांडून लोणावळा भागात नोकरीसाठी जातात.

अणघईचा किल्ला हा अल्पपरिचित आहे. या किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४ कातळटप्पे चढून जावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत गिर्यारोहणाचे साहित्य, रोप इत्यादी असणे आवश्यक आहे.
26 Photos available for this fort
Anghai
Anghai
Anghai
पहाण्याची ठिकाणे :
कळंब गावाच्या मागे असलेल्या डोंगररांगेत ३ शिखरे दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूचे बाहेर आलेले शिखर म्हणजे अणघई किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून बाहेर पडल्यावर पायवाटेने शेतातून, बांधावरुन चालत १५ मिनिटात आपण अंबा नदीवरील पूला पर्यंत पोहोचतो. या पुलाच्या डाव्या बाजूला एक डोह आहे त्याला बुरुना डोह या नावाने गावकरी ओळखतात. पूल पार केल्यावर समोर एक झाडीने भरलेला डोंगर लागतो. त्या डोंगरावर ५ मिनिटे चढून गेल्यावर एक आमराई आणि त्यामध्ये बांधलेले घर दिसते. या घरा समोरुन जाणारी पायवाट अनघईचे शिखर व त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराचे शिखर याच्या मधील घळीतून वर जाते. आमराईच्या पुढे सागाचे दाट जंगल आहे. ते १५ मिनिटे चढून पार केल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथून पठार पार केल्यावर वाट परत दाट जंगलात शिरते. येथे काही ठिकाणी दगडांवर , झाडांवर दिशादर्शक बाण काढलेले आहेत. त्या बाणांच्या सहाय्याने आपण अनघई किल्ल्याच्या घळीच्या पायथ्याशी पोहोचतो. या ठिकाणी साधारणपणे १५ फ़ूट उंच कातळ भिंत आहे. भिंतीवर चढण्यासाठी होल्ड आहेत. त्याच्या आधारे भिंत चढून जाता येते. दुसरा पर्याय म्हणजे भिंत संपेपर्यंत उजव्या बाजूला जावे. या ठिकाणी चढाई करण्यासाठी होल्ड आहेत आणि बाजूच्या झाडांचा आधारही घेता येतो. हा कातळटप्पा चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा पाहून पुन्हा आपण गुहेच्या उजव्या बाजूला आल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण अनघईवर जाणार्‍या नळीच्या खालच्या तोंडापाशी येतो.

नळीत अनेक लहान मोठे खडक पडलेले आहेत. हा नळीतला ७०-८० अंशातला चढ चढून आपण नळीच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचतो. पुढे वाट बंद झालेली असल्याने उजव्या बाजूच्या कातळावर जावे लागते. या कातळाला तीव्र उतार आहे त्यामुळे हा १० फ़ूटी कातळ जपून चढून जावा लागतो. कातळाच्या शेवटच्या टप्प्यात डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या ६ सुबक पायर्‍या दिसतात. ( याठिकाणी अजूनही पायर्‍या आहेत पण त्या माती खाली बुजलेल्या आहेत.) या पायर्‍या चढून गेल्यावर आपण कातळ टप्प्याच्या वरच्या भागात पोहोचतो. (पहिल्या कातळ टप्प्या पासून नळीचा दुसरा टप्पा आणि पुढे तिसरा कातळ टप्पा पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.) पुढे घळीतून चढत १५ मिनिटात अणघईचा डोंगर आणि उजव्या बाजूचा डोंगर यामधल्या खिंडीत पोहोचतो. शेवट़च्या टप्प्यात दाट झाडी आहे. खिंडीत आल्यावर अणघईवर जाणार्‍या कातळात खोदलेल्या खोबण्या दिसतात. या खोबण्यातील अंतर जास्त असल्याने पूर्ण हाताचा भार देऊन शरीर वर ओढून घ्यावे लागते. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍यांनी वर चढून गेल्यावर पुन्हा एक कातळटप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार केल्यावर आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. गडमाथा आटोपशीर आहे. माथ्यावर अणघई देवीचे मंदिर आणि ३ पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावरून तैलबैला, सुधागड दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
कळंब हे अनघई किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. मुंबई - खोपोली - कळंब हे अंतर ८७ किलोमीटर आहे. मुंबईहून खोपोली गाठावे . खोपोली पाली रस्त्यावर खोपोली पासून २९ किलोमीटर अंतरावर जांभूळपाड्याला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्यावरून एक रस्ता ६ किलोमीटर वरील कळंब गावात जातो.

मुंबई - खोपोली प्रवास ट्रेनने आणि खोपोली - पाली प्रवास एसटीने केल्यास परळी गावात उतरावे. या गावतून सहा आसनी रिक्षा कळंब गावात जातात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था पाली खोपोली रस्त्यावरील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कळंब गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी ३ ते ३.३० तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
ऑक्टोबर ते मार्च
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)