मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

आसावा (Asawa) किल्ल्याची ऊंची :  2400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाण्यातील पूरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणार्‍या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.


Aasawa
5 Photos available for this fort
Asawa
Asawa
Asawa
Asawa English Map
Asawa English Map
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडावर सापडलेली तोफ़ याठिकाणी लाकडी गाड्यावर बसवलेली आहे. तोफ़ेच्य़ा जवळ कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.


हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दाराची जागा दिसते. याच्या समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहे. हे टाकं लहान असून त्याची रचना मोठया टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी (चर) खोदलेला आहे. या चरातून येणारे पाणी टाक्याला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायर्‍या कोरलेल्या आहेत.

उध्वस्त प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. या वाटेने उतरतांना देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात .तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात. या वाटेवर छोटा कातळ टप्पा आहे. तो पार करुन खाली उतरल्यावर दोन वाटा फ़ूटतात. डावीकडे जाणारी वाट मारुतीच्या भग्न मुर्तीपाशी जाते. तर उजवीकडे जाणारी वाट गुहांपाशी जाते. याठिकाणी ३ गुहा आहेत. गुहा पाहून आल्या वाटेने पुन्हा गडमाथ्यावर आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते.

गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून ९२ किमीवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना १० किमीवर वारंगडे हे गाव आहे. वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्या बाजूस (बोईसरहून चिल्हार फाट्याकडे जातांना) बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता जातो. (या रस्त्याच्या सुरुवातीला एक मोबाईलचा टॉवर आहे). या फॅक्टरीच्या कंम्पॉऊंडला लागून जाणारा रस्ता ८५० मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच आंगणवाडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर (म्हणजेच वारंगडे - बारीपाडा रस्त्याच्या उजव्याबाजूस) एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहळ ओलांडून जावे लागते. किल्ल्याच्या डोंगरावर जाणारी वाट मळलेली व रूंद खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारण १ ते १.५ तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १.३० (दिड) तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जून ते मार्च
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अनंतपूर किल्ला (Anantapura Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)
 अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)
 आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)
 अवचितगड (Avchitgad)  आवाडे कोट (Awade Kot)