बाणकोट
(Bankot) |
किल्ल्याची ऊंची : 
300 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : रत्नागिरी |
श्रेणी : मध्यम |
महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडी चे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे, ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जून्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला "हिम्मतगड " आणि " फोर्ट व्हिक्टोरीया" या नावांनीही ओळखाला जातो.
|
|
इतिहास : |
बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगिजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास "हिम्मतगड" असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने त्याला "फोर्ट व्हिक्टोरीया" नाव दिले. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नव्हते, त्यामुळे इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला.
|
पहाण्याची ठिकाणे : |
गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. गडाला सर्व बाजुंनी जांभ्या दगडात खोदुन काढलेला खंदक आहे. गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवडया आहेत. उजव्या बाजूच्या देवडीत ६ पाण्याचे हौद आहेत. तिथुन पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जीना आहे. त्यावरून वर गेल्यावर सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस २ जीने आहेत. पश्चिमेकडील दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. हया बुरूजात खोल विहीर आहे ,ती आता बुजलेली आहे. पश्चिमेकडे बुरूजातच पहारेकर्यांसाठी खोली आहे. हया पाण्याच्या बुरूजात चोर दरवाजा आहे. बाणकोटहून वेळासकडे जाताना वाटेत "पाणबुरूज" किंवा मधला बूरूज लागतो. मुळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिध्दीने हा बुरूज बांधला.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई.- गोवा महामार्गावर महाडच्या अगोदर टोल फाटयावरून आंबेत, मंडणगड मार्गे बाणकोटला जाता येत. मुंबई - बाणकोट अंतर अंदाजे २४८ कि.मी. आहे. बाणकोट गावातून पक्क्या रस्त्याने स्वत:चे वाहान घेऊन किल्ल्यावर जाता येते.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
बाणकोट गावातून चालत अर्धा तास लागतो. |
सूचना : |
बाणकोट पासून ३ किमीवर "वेळास" हे कासवांचे गाव आहे. जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात या गावात सह्याद्री निसर्ग मित्र या सस्थेतर्फे "कासव महोत्सव" आयोजित केला जातो. या गावात रहाण्याची व जेवणाची सोय होते.
|