मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
भैरवगड हा कोयनानगर विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या (सह्याद्रीच्या) सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाहीत. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.


सूचना :-

१) २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास रुपये ५०,०००/- दंड / ३ वर्षाची सजा होऊ शकते.

२) भैरवगडावर पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ व हळद सोबत घेऊन जावे.

३) भैरवगड ते प्रचितगड असा 2 दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात करावा लागतो. त्यासाठी तंबू बरोबर घेऊन जावा. जंगलात वन्य पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भितीने वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत.



Bhairavgad (Satara)
7 Photos available for this fort
Bhairavgad (Satara)
Bhairavgad (Satara)
Bhairavgad (Satara)
इतिहास :
इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.
पहाण्याची ठिकाणे :
गडावर एक प्रशस्त मंदिर आहे. मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फुट ऊंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. येथे १०० जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर शिवरायांचा छोटा पुतळा बसवलेला आहे.

भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणार्‍या पायवाटेने जावे. किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरुज दिसतो. येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे. पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी बसणारे टेहळे येथे बसून लांबवर नजर ठेऊ शकत. या गुहेमुळे पाऊस वार्‍यापासून त्यांचे संरक्षण होत असे. येथून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरुज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे. या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे, येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते. मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील गोवळ पाती गावात उतरणारी वाट आहे या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.
पोहोचण्याच्या वाटा :
भैरवगडावर जाण्यासाठी ४ वाटा आहेत.
१) हेळवाकची रामघळ मार्गे :-
हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.. ही रामघळ पाहून , रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.
वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.)


२) दुर्गवाडी मार्गे :-
या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून डेरवण मार्गे दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणत: १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे - गोवळ पाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.


३) गव्हारे मार्गे :-
गडावर जाण्यासाठी गव्हारे (गोवारे) गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्‍या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरा पर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.


४) गोवळ पाती मार्गे :-
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना "आसूर्डे फाटा" २१ किमीवर आहे. तिथून डावीकडील रस्ता २२ किमीवरील गोवळ पाती गावापर्यंत जातो.(यातील शेवटचे ५ किमी कच्चा रस्ता आहे.) गोवळ पाती गावातून गडावर जाण्यासाठी गावकर्‍यांनी पायर्‍या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायर्‍यांनी जाता येते.(येथे येण्यासाठी गावातून १.३० तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात आपण भैरवगडावरील मंदिरात पोहोचतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
राहाण्याची सोय :
भैरवगडावरील मंदिरात १०० जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.आपण स्वत: करावी .
पाण्याची सोय :
भैरवगडावर बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) दुर्गवाडी / गव्हारे मार्गे ३.३० तास लागतात. २) हेळवाकच्या रामघळी मार्गे ६ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: B
 बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बहुला (Bahula)
 बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))
 भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)
 भवानीगड (Bhavanigad)  भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवागड (Bhivagad)
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)  भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)  भुदरगड (Bhudargad)
 भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)  भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)
 बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)