बितनगड
(Bitangad) |
किल्ल्याची ऊंची : 
4000 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: कळसूबाई |
जिल्हा : नगर |
श्रेणी : कठीण |
बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. बितका गावातून बितनगडाचा डोंगर पिरॅमिडसारखा दिसतो. मुख्य डोंगररांगेपासून सुटवलेल्या या किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्यावरील अवशेष आणि अरुंद माथा पाहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
बितका (बितंगवाडी) गावातील देवळाच्या बाजूने डांबरी रस्ता किल्ल्याच्या पायथ्या जवळ जातो. हा रस्ता जिथे संपतो तेथून कच्चा रस्ता आणि पुढे मळलेली पायवाट आहे. या पायवाटेने आपण दाट झाडीत शिरतो. या ठिकाणी शेंदुर लावलेले काही दगड आहेत. यांना स्थानिक लोक माऊली या नावाने ओळखतात. पुढे पायवाट खडी चढण चढत कातळ टप्प्यापाशी पोहोचते. येथे कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. या पायर्या जेथे चालू होतात. तेथे उजव्या पायवाटेच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. कातळात कोरलेल्या पायर्या अरुंद आहेत. पायर्या चढण्या उतरण्यासाठी कातळात जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत. त्याच्या आधार घेऊन पायर्या चढता येतात. पायर्या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्या निसरड्या होऊ शकतात. पायर्या संपल्यावर काही अंतर चढून गेल्यावर एक दोन खांबांवर तोललेली प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहून पुढे गेल्यावर एक पाण्याचे फ़ुटलेले टाके आहे. टाक्यापुढे कारवीची दाट झाडी आहे. त्यामधील पायवाटेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण चढलो त्याच्या विरुध्द दिशेला खाली उतरुन गेल्यावर पाण्यची दोन कोरडी टाकी आहेत. ती पाहून डाव्या बाजूने गडाला वळसा घातल्यावर एक पाण्याचे टाक आहे. त्याच्या पुढे चालत गेल्यावर पाण्याची तीन टाकी आणि एक पाण्याने भरलेली गुहा आहे. ते पाहून पुढे गेल्यावर वाटेत पाण्याचे एक टाक आहे . त्या टाक्याच्या पुढे चालत गेल्यावर आपण परत पायर्यांच्या मार्गावर येतो . इथे आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गड उतरण्यास सुरुवात करावी. |
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून म्हैसघाट चधून कोकणवाडी , एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो. एकदरा ते बितका या बितनगडा जवळील गावाचे अंतर ५ किलोमीटर आहे. या भागात एसटी बसेसचे प्रमाण आहे. सिन्नर बितका दिवसातून ३ बस आहेत. अन्यथा टाकेद खिरवीरे चालणार्या जीप्सनी एकदर्याला उतरुन चालत बितनगडाचा पायथा गाठण्यास एक ते दीड तास लागतो.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीतील मंदिरात राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही.
|
पाण्याची सोय : |
गडावर पाण्याची सोय नाही.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
बितकातून (बितंगवाडी) १ तास लागतो. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
जुलै ते मार्च ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे. |