मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भामेर (Bhamer) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: साक्री, धुळे
जिल्हा : धुळे श्रेणी : मध्यम
धुळे जिल्ह्यात असणार्‍या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला, भामेर गावाभोवती नालेच्या आकारात (U) पसरलेला आहे. या किल्ल्याने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार बांधून, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला पूर्ण संरक्षित केले आहे. असा हा नितांत सुंदर किल्ला (आणि गाव) प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे असा आहे. बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गडावर यात्रा भरते.


Bhamer Fort
33 Photos available for this fort
Bhamer
Bhamer
Bhamer
इतिहास :
भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रवती नगर होते, तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय.प्राचीनकाळी सुरत - बुर्‍हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाइ. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे.
अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता. किल्ल्यावरील १८४ लेणी (गुंफा) याच काळात खोदल्या गेल्या असाव्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.
पहाण्याची ठिकाणे :
आपण धुळे - सुरत रस्त्यावरुन जसजसे भामेर कडे येऊ लागतो, तसतसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी एका डोंगरावर एकाच ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो, आपल्या डाव्या बाजूस २० फूट उंच प्रवेशद्वार आपले स्वागत करते या प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला विहीर आहे विहीरीचे पाणी पोहर्‍याने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था कार्यान्वयित आहे गावातील माणसे हौद भरतात, पण आज हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले १२ फूटी गोल खांब उभे असलेले दिसतात. पेशव्यांच्या काळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. गावातून फिरताना ठिकठिकाणी, घरांच्या पायथ्यात, भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष दृष्टीस पडतात. गावातील नंदी गल्लीत २.५ फूटी नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर उघड्या आभाळाखाली पडलेली आहे. त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकर्‍यांनी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा रस्त्यातून हटवण्याचा त्यांचा विचार आहे, पण मुर्ती जड असल्यामुळे ते अजून शक्य झालेले नाही.

गाव पार केल्यावर गावामागील ३ डोंगरांच्या आपण समोर येतो. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे. समोरच्या डोंगरावर कोरीव लेणी किंवा गुंफा आहेत, तर डाव्या होताच्या डोंगरावर भामेर गडाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मानवनिर्मित मोठी खाच आहे, ती गावातूनही दिसते पण तीचे प्रयोजन त्याजागी गेल्यावरच कळते आणि आपण थक्क होतो.

गावामागून उजव्या हाताला असलेल्या डोंगरावर एक मळलेली पायवाट दिसते, त्या वाटेने १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. येथे काटकोनात २ प्रवेशद्वारे असून त्या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला मस्जिदीचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. प्रथम उजव्या हाताच्या डोंगरावर चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराच्या स्थानाचे महत्त्व कळते या किल्ल्यात प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू बालेकिल्ल्यातून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. त्याला कुठलाही आडोसा मिळणार नाही. उजव्या हाताच्या डोंगरावर छोटासा दगडांचा टप्पा आहे. तो चढून गेल्यावर आपण मशिदीपाशी पोहचतो. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन मग छोटेसे मैदान / पठार पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन लेणी खोदलेली आहेत. एकूण १८४ लेण्यांपैकी १० लेणीच आपल्याला पाहता येतात १० * १० फूट ते २५ * १० फूट अशी लांबी रुंदी असलेली लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. त्यात कोरीव काम, खांब अथवा मुर्त्या नाहीत. १० लेण्यांपुढील कडा कोसळल्यामुळे पुढील लेणी पाहता येत नाही. गव्हर्नमेंट गॅझिटीयर प्रमाणे डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या लेण्यांमध्ये जैन मुर्त्या आहेत लेण्यांमध्ये पाणी व गाळ साठलेला आहे.

लेण्या पाहून झाल्यावर आपण खडकात खोदलेल्या पायर्‍यांनी डाव्या हाताच्या डोंगरावर चढाइ सुरु करायची. या चढाइ दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला सतत खालच्या अंगाला दिसत रहाते पायर्‍या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत काही गुंफा आहेत. तिथून थोडे वर चढून गेल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर नक्षी काढलेली आहे, तसेच भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व बदकांच्या जोडी सुध्दा दरवाजावर कोरलेली आहे. गुफां २४ चौ मीटर असून चार दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे ६ मी × ६ मी व २० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात होता.

गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते, तर उजव्या हाताला दगडात खोदलेली प्रचंड खाच, जी आपल्याला पायथ्यापासून दिसत असते. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच दगडात बनविण्यात आली आहे. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला खोल दरी ही खाच किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसत असल्यामुळे तिथेच बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असा शत्रूचा गैरसमज होत असे, अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खाचेत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असे. तसेच शत्रुने बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यास बुरुजावरुन दोर टाकून या खाचेत उतरुन पोबारा करणे सहज शक्य होते.

दगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते. भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर एक छोटे मंदिर व त्याच्या बाजूला २० × २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक आहे. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर किल्ल्यावरुन पूर्वेकडे दोन जोड शिखरे दिसतात. ती राव्या - जाव्या या नावाने प्रसिध्द आहेत. त्याबद्दल दंतकथाही या भागात सांगितली जाते


पोहोचण्याच्या वाटा :
भामेर किल्ला, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येतो. धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ४८ किमी अंतरावर व साक्रीच्या अलिकडे ३ किमी अंतरावर नंदूरबारला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन ७ किमी अंतरावर भामेर गाव आहे
राहाण्याची सोय :
गडावर असलेल्या खाचेत १० जणांची उघड्यावर झोपण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी .
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
संपूर्ण गड व गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी ४ तास लागतात.
सूचना :
१) गड पश्चिमाभिमुख असल्यामुळे सकाळी लवकर गड चढण्यास सुरुवात करावी म्हणजे गड चढताना ऊन लागत नाही. गड पाहून झाल्यावर गावातील प्रेक्षणीय ठिकाणे पहावीत.

२) बलसाणे लेणी ही जैन लेणी साक्री - नंदूरबार रस्त्यावर भामेरपासून २० किमीवर आहेत.

३) भामेर व रायकोट हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.

४) रायकोटची माहीती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: B
 बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बहुला (Bahula)
 बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))
 भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)
 भवानीगड (Bhavanigad)  भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवागड (Bhivagad)
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)  भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)  भुदरगड (Bhudargad)
 भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)  भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)
 बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)