मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | किल्ल्याची ऊंची :  2975 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: देवगिरी | ||||
जिल्हा : छ.संभाजीनगर | श्रेणी : मध्यम | ||||
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते. सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी "सुरगिरी" या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची "देवगड व धारगिरी" अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले. |
|||||
|
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या. या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती. यापैकी ‘ लासूर वेस ’ एक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे. १ किल्ल्यातील वास्तू : आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले, ज्यांची लांबी १२ सेंमी एवढी आहे, असे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्यांच्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्याच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्या दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्या प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्या दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्या दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे. विहीरीत उतरण्यासाठी पायर्यांची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची. २ हत्ती तलाव : मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी * रुंदी-३८ मी * खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते. ३ भारतमाता मंदिर : या हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जाणार्या वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे. ४ चॉद मिनार : भारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत. सध्या या मनोर्यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चॉद मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. हे सर्व पाहून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात. ५ कालाकोट देवगिरी : कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्यांच्या देवड्या, मग पायर्या लागतात. या सर्व पायर्या चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्या लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्या लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्यातून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या’ मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत .आत गेल्यावर एक निमुळता चौक दिसतो. तो उघडाच आहे. यावर छत नाही तो ४ ते ५ माणसे मावतील एवढाच आहे, त्यामुळे तिथे पोहचल्यावर उजवीकडच्या पायर्यांनी ओट्यावर चढावे लागते. कारण चौकात आल्यावर ओट्यावर चढणे हा एकच मार्ग आहे. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनविलेला आहे. येथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकुन शत्रु इथपर्यंत आला तर पुढे या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोरवाटे सारखा दिसणारा मार्ग ठेवलेला आहे.या खिडकी खाली दोन पायर्या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय केलेली आहे. पण खरा भुयारी मार्ग तर डावीकडे आहे. एवढेच नव्हे तर वर काही काही ठिकाणी भुयारी मार्गात कातळातील खिडक्या आहेत. याचा उपयोग वर असणार्या सैनिकांना शत्रूवर दगडधोंडे टाकण्यासांठी होत असे. हा सर्व भुयारी मार्ग ५० ते ६० मी लांबीचा आहे. पुढे या भुयारी मार्गातूनच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायर्या बांधलेल्या आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर शेवटच्या ठिकाणी जिथे आपण वरच्या टप्प्यावर पोहचतो, तिथे एक तवा ठेवलेला असायचा. त्यावर गरम तेल व मिरच्या ओतून हा धूर या अंधारी मार्गात सोडण्यात येत असे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करुन हा किल्ला जेवढा अभेद्य बनवता येइल तेवढा बनवला होता. एकंदर पाहाता हा किल्ला एवढा अभेद्य, दुर्गम आणि भक्कम आहे की त्याला सरळमार्गाने जिंकूण घेणे कठीणच होते. भुयारी मार्गातून एकदा किल्ल्यावर आले की पुन्हा कातळकड्यात खोदलेल्या पायर्या लागतात. थोडे वर चढून गेले की गणेशाचे मंदिर आहे. एकंदर मंदिराच्या बांधणीवरुन हे मंदिर अलिकडच्या काळातील असावे. प्रथम वंदितो तुज गणराया असे म्हणून गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि वरच्या पायर्या चढायला लागायचे. १५० पायर्या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्यात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
देवगिरीचा किल्ला छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - धुळे रस्त्यावर छ.संभाजीनगर पासून १५ किमी अंतरावर आहे. या देवगिरीला जाण्यासाठी छ.संभाजीनगर-धुळे, छ.संभाजीनगर - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय छ.संभाजीनगरहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
किल्ल्यात राहण्याची सोय नाही. छ.संभाजीनगरला राहण्याची सोय होऊ शकते. | |||||
जेवणाची सोय : | |||||
किल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही. | |||||
सूचना : | |||||
छ.संभाजीनगरहून देवगिरी , खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर , वेरुळची लेणी आणि छ.संभाजीनगरची पाणचक्की ही ठिकाण एकाच दिवसात पाहाता येतात. दररोज छ.संभाजीनगरहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सहल (गाइडेड टूर) या ठिकाणांना जाते. |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D | दांडा किल्ला (Danda Fort) | दार्या घाट (Darya Ghat) | दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) | दातेगड (Dategad) |
दौलतमंगळ (Daulatmangal) | देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) | डेरमाळ (Dermal) | देवगडचा किल्ला (Devgad Fort) |
देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | धाकोबा (Dhakoba) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) |
धारावी किल्ला (Dharavi Fort) | धर्मापूरी (Dharmapuri) | धारूर (Dharur) | धोडप (Dhodap) |
धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) | द्रोणागिरी (Dronagiri) | डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) | दुंधा किल्ला (Dundha) |
दुर्ग (Durg) | दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) |