मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुरुडच्या सागर किनार्‍यावरुन पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्‌मदूर्ग उर्फ कासा किल्ला. मुरुड - जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्‌मदूर्ग पहाण्यासाठी जात नाहीत. कारण जंजिर्‍याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे पद्‌मदूर्गला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करुन या किल्ल्यावर जावे लागते.

छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ‘पद्‌मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.
4 Photos available for this fort
Padmadurg ( Kasa Killa)
Padmadurg ( Kasa Killa)
Padmadurg ( Kasa Killa)
इतिहास :
जंजिर्‍याच्या सिद्दीचा कोकणपट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुड जवळ सामराजगड बांधून सिद्दीच्या जमिनीवरील हालचालीवर नियंत्रण आणले, तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.

ही बातमी सिद्दीला कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्ल्यामुळे त्याच्या समुद्रावरील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती, परंतू महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानाची आधीच नेमणूक केली होती. किल्ल्याची रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६७५ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. पद्‌मदूर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहीते यांची निवड केली.

इ.स १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजिर्‍याची मोहिम काढली. या मोहिमेत मचव्यांवरुन तोफांचा मारा जंजिर्‍यावर केला, पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंतांनी जंजिर्‍याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्‌मदूर्गवर काम करणार्‍या अष्टागारातील सोनकोळ्यांच्या प्रमुखाने, लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्विकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८ १० सहकार्‍यांसह पद्‌मदूर्गतून बाहेर पडले अंधाराचा फायदा घेत जंजिर्‍याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारकर्‍यांची वाट पाहात राहीला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही. हे पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्‌मदूर्ग गाठला.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्र्‍यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्र्‍यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलांने नम्रपणे पालखी नाकारली. यावरुन महाराज काय ते समजले त्यांनी मोरोपंतांना एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ ठेऊन लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची ‘सरपाटीलकी’ दिली.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्‌मदूर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्‌मदूर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला पण त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.

पहाण्याची ठिकाणे :
मुरुडहून बोटीने अर्ध्यातासात पद्‌मदूर्गजवळ पोहचता येते. पद्‌मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. बोटीने पद्‌मदूर्ग व त्याचा पडकोट त्यांच्या मध्ये उतरता येते. बोटीतून उतरल्यावर प्रथम डाव्या हाताचा असणारा पडकोट पाहून घ्यावा. पडकोटच्या उध्वस्त (अस्तित्वात नसलेल्या) प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला भग्न वास्तूचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर आपण पद्‌मदूर्गावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा बुरुजावर जातो. या बुरुजाच्या चर्र्‍यांना कमळाच्या पाकळ्र्‍यांसारखा आकार दिलेला आहे. त्यामुळेच या किल्ल्याचे नाव ‘ पद्‌मदूर्ग’ पडले असावे.
या बुरुजाच्या आत तटबंदीत कोठार आहे. बुरुजात सर्व दिशांना तोफा ठेवण्यासाठी झरोके केलेले आहेत. आजही त्यातील तीन तोफा असून त्र्‍यांचा रोख समुद्रावर व गडप्रवेशाच्या मार्गावर आहे बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये संडास आहे.

पडकोटच्या तटबंदीची उंची समुद्रतटापासून २५ फूट असावी. आता समुद्राच्या मार्‍याने तटबंदीची झालेली पडझड व किल्ल्यात साठलेल्या वाळूमूळे तटबंदीतील जिने, फांजी झाकले गेले असावेत. तटबंदीवरुन पडकिल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. प्रदक्षिणेत तटबंदीवर व किल्ल्याच्या आत जागोजागी पडलेल्या तोफा दिसतात. याशिवाय तटबंदीला लागून असलेली पडकी वास्तू , दोन हौद व त्यामधील थडग दृष्टीस पडतात. पडकोटची उत्तरेकडील तटबंदी ढासळलेली असून त्याच्या मुख्य किल्ल्याकडील टोकाला एका पडक्या वास्तूचे अवशेष आहेत. पडकोटच्या सध्या शाबूत असलेल्या तटबंदीच्या बाहेर समुद्राच्या बाजूने तटबंदीचा अजून एक घेर पूर्वी होता. आता त्यापैकी थोडेच अवशेष शिल्लक आहेत. पश्चिमेला एका बुरुजाचे अवशेष शिल्लक आहेत त्यावरुन पद्‌मदूर्गच्या पडकोटाचे विहंगम दृश्य दिसते.

पडकोटच्या समोरच पद्‌मदूर्गचा मागील बाजूचा दरवाजा आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करता येतो किंवा उजव्याबाजूने किल्ल्याला वळसा घालून मुख्य प्रवेशद्वाराने किल्ल्यात जाता येते. किल्ल्याच्या बुलंद प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी १० पायर्‍या चढून जावे लागते. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत. या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्र्‍यांचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्‍याच्या मार्‍याने झिजलेले आहेत. परंतू त्यात वापरलेल्या चुन्याचा थर अजूनही तसाच आहे. दगड झिजला तरी चुन्याची पट्टी तशीच राहीली आहे. त्यावरुन चुन्याच्या मजबुतीची कमाल वाटते.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला काही वास्तूंचे अवशेष दिसतात. त्र्‍यांच्या पूढे तीन हौद आहेत. हौदांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. हौदाच्या मागे बुरुजात/तटबंदीत दोन कोठ्या आहेत.

प्रवेशद्वाराच्या समोरच तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर ५ फूटी प्रशस्त फांजी लागते. या फांजीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. फांजीवरुन मागच्या दारकडे (पडकोटच्या दिशेला) जाताना वाटेत तटबंदीत जागोजागी जंग्या दिसतात. तसेच तटबंदीच्या आतील बाजूस किल्ल्यात पडलेल्या अनेक तोफा आढळतात. मागील दारच्या बाजूला असलेल्या बुरुजांना तोफेसाठी सर्व दिशांना झरोके आहेत. या झरोक्यातून पडकोटच्या कमळ (पद्‌म) बुरुजाचे अप्रतिम दृश्य दिसते. या दरवाज्या जवळच तटबंदीला लागून अनेक वास्तूंच्या (बॅरक्स) भिंती एका रेषेत आहेत. स्वातंत्र्यानंतर काही काळ हा किल्ला कस्टमच्या ताब्यात होता तेव्हा त्र्‍यांनी या बॅरक्स आणि हौद बांधले असावेत. पद्‌मदूर्गला एकूण ६ बुरुज आहेत. पद्‌मदूर्ग व पडकोट मिळून ३८ तोफा आहेत. गडावरुन सामराजगड व मुरुडचा किनारा दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुरुड गाव संपल्यावर खाडी लागते. त्या खाडीत असलेल्या होडीवाल्र्‍यांशी बोलून पद्‌मदूर्गावर जाण्यासाठी खाजगी होडी ठरवावी लागते. मुरुडला जाऊन लगेच होडी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आदल्या दिवशी होडी ठरवून ठेवावी व सकाळीच बोटीचा २० मिनीटांचा प्रवास करुन पद्‌मदूर्गावर जावे.

अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की, पद्‌मदूर्गाला जाण्यासाठी जंजिर्‍याला जाणार्‍याच होड्या जातात. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी, दंडाराजापूरीहून मुसलमान लोक आपल्या शिडांच्या होड्या घेऊन जंजिर्‍याला जातात, तर पद्‌मदूर्गावर मुरुडमधील हिंदू कोळी लोक इंजिनाच्या बोटीतून पद्‌मदूर्गावर घेऊन जातात. मुरुड मधील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी असल्यामुळे फावल्या वेळातच ते पद्‌मदूर्गला येण्यास तयार होतात व त्यासाठी भरपूर पैसेही घेतात. एका होडीतून साधारणत: २० माणसे जाऊ शकतात.



राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मुरुडहून बोटीने अर्ध्यातासात पद्‌मदूर्गजवळ पोहचता येते.
जिल्हा Raigad
 अवचितगड (Avchitgad)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  बिरवाडी (Birwadi)
 चांभारगड (Chambhargad)  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  कुलाबा किल्ला (Colaba)
 दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  द्रोणागिरी (Dronagiri)  घारापुरी (Gharapuri)
 घोसाळगड (Ghosalgad)  हिराकोट (Hirakot)  ईरशाळ (Irshalgad)  जंजिरा (Janjira)
 कर्नाळा (Karnala)  खांदेरी (Khanderi)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोकणदिवा (Kokandiva)
 कोंढवी (Kondhavi)  कोर्लई (Korlai)  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लिंगाणा (Lingana)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  माणिकगड (Manikgad)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 मृगगड (Mrugagad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पालगड (Palgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पेब (विकटगड) (Peb)  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))
 प्रबळगड (Prabalgad)  रायगड (Raigad)  रामदरणे (Ramdarne)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रेवदंडा (Revdanda)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सांकशीचा किल्ला (Sankshi)
 सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  शिवथरघळ (Shivtharghal)  सोंडाई (Sondai)
 सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  सुरगड (Surgad)  तळगड (Talgad)
 तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))  उंदेरी (Underi)