सामराजगड
(Samrajgad) |
किल्ल्याची ऊंची : 
165 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : रायगड |
श्रेणी : सोपी |
मुरुड समुद्रकिनार्याच्या दक्षिण दिशेकडील टेकडीवर ‘ सामराजगड’ उर्फ ‘दंडा राजापूरी’ किल्ला आहे. जंजिर्यावर लक्ष ठेवण्यासाठी व खुष्कीच्या मार्गाने वचक ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सामराजगडाची उभारणी केली होती. जंजिर्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे.
|
|
इतिहास : |
सामराजगड बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना फौजेनिशी पाठविले. त्यांनी सिद्दीचा दंडाराजापूरीच्या आसपासचा मुलुख ताब्यात घेतला. सिद्दीने हबशी घोडेस्वार मराठ्यांवर पाठविले. या युध्दात ३०० हबशी मारले गेले. सिद्दीने महाराजांशी तहाची बोलणी केली, पण महाराज बधले नाहीत राजापूरीजवळ जिंकलेल्या डोंगरात महाराजांनी सामराजगड बांधला.
सामराजगड बांधल्यापासून तो सिद्दीच्या डोळ्यात खुपत होता. तो घेण्यासाठी सिद्दीने आपले निवडक सैनिक होडीत बसवून किनार्यावर उतरविले. त्यांनी सामराजगडा भोवतीच्या माडांच्या झाडांना तोफा बांधून किल्ल्यात मारा केला, पण तोफा झाडावरुन खाली पडून सिद्दीचेच नुकसान झाले.
११ फेब्रुवारी १६७१ हा होळीचा दिवस होता. जंजिर्याच्या मोहिमेसाठी महाराज रायगडावरुन निघाले होते. त्यांचा मुक्काम रायगडापासून ९ किमीवर होता. या मोहिमेपूर्वी सिद्दीने सामराजगड जिंकण्याचा बेत आखला. रात्रीच्या गडद आंधारात सिद्दी कासिम होड्यांमधून आपले सैन्य घेऊन बाहेर पडला व सामराजगडाच्या पायथ्याशी उतरला त्यांनी तटाला शिड्या, दोरखंड लावले. याच वेळी जमिनीच्या बाजूने सिद्द खैरत आपल्या ५०० हबशी सैनिकांनिशी किल्ल्याच्या दुसर्या बाजूला आला. त्याने होळीच्या रंगात बेसावध असलेल्या मराठ्यांवर जोरदार हल्ला केला. त्यांना सावरायला वेळही मिळाला नाही. तरीही नेटाने मराठे सिद्दी खैरतवर तुटून पडले. या संधीचा फायदा घेऊन सिद्दी कासिमने आपले सैन्य दुसर्या बाजूने किल्ल्याच्या तटावर चढविले. सिद्दीच्या या दुहेरी हल्ल्यामुळे मराठी सैन्य विभागले गेले. तरीही मराठे प्राणपणाने लढत होते, इतक्यात दारु कोठाराचा स्फोट झाला. त्यात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक ठार झाले व सामराजगड सिद्दीच्या ताब्यात गेला.
मध्यरात्री झालेल्या स्फोटाच्या आवाजाने शिवाजी महाराज जागे झाले. त्यांनी आपले जासूद ताबडतोब सामराजगडाकडे रवाना केले. सामराजगडाची बातमी कळल्यावर शिवाजी महाराजांनी जंजिर्याची मोहिम रद्द केली.
|
पहाण्याची ठिकाणे : |
सामराजगडाच्या बालेकिल्ल्याची तटबंदी शाबुत आहे. दगड एकमेकांवर नुसते रचून ही तटबंदी बनविण्यात आली होती. सामराजगडावरुन जंजिर्याचे वेगळ्याच कोनातून दर्शन होते. तसेच पद्मदूर्गही स्पष्ट दिसतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुरुड गावातून जंजिर्याकडे जातांना खाडीवरचा पूल लागतो. पूल ओलांडल्यावर डाव्या हाताला टेकडी दिसते. या टेकडीच्या पायथ्याशी एकदरा गाव आहे. गावातून रस्ता शंकराच्या देवळाकडे जातो. देवळाच्या बाजूने पायवाट टेकडीवर जाते. या वाटेने १० मिनीटात सामराजगडावर पोहोचता येते.
|
राहाण्याची सोय : |
गडावर रहाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
|
पाण्याची सोय : |
गडावर पाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
गडावर जाण्यासाठी एकदरा गावातून १० मिनीटे लागतात. |