मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सुधागड (Sudhagad) किल्ल्याची ऊंची :  590
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली."

शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.

सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.
52 Photos available for this fort
Sudhagad
Sudhagad
Sudhagad
पहाण्याची ठिकाणे :
सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात



पंत सचिवांचा वाडा

पाच्छापूर मार्गे चढून गेल्यावर आपण पठारावर पोचतो. येथे तलाव डाव्या बाजूस ठेवून तेलबैला समोर ठेवून सरळ चालू लागलो की १० मिनिटात एका वाड्यात पोचतो. सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.

वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. पैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात. एक खोली बंद असून त्यामध्ये विश्वस्त मंडळाचे सामान ठेवलेले असते. काही कार्यक्रम अथवा सण असल्यास ती वापरात येते. तर पहिल्या खोलीत ट्रेकक्षितीज संस्थेने आपली औजारे ठेवली असून ती श्रमदानाच्या वेळी वापरण्यात येतात. वाड्याच्या बाजूस एका छोट्या घरात वाड्याची देखभाल करणारी मामी राहते. ही वयस्क असली तरी पूर्ण वाड्यात शेण सारावण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. येणाऱ्या दुर्गाप्रेमिनी हा वाडा साफ ठेवणे अध्यारुतच आहे.



पश्चिमेकडील पठार

पश्चिमेकडील पठार म्हणजे पाच्छापूर कडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसर. येथे खूप वस्तूंचे अवशेष आणि जोती दिसतात. वाड्याच्या आवारातून बाहेर पडून सरळ चालत गेलो कि टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर कर्नाळा दिसतो. या पठारावर मोठा तलाव आहे. या तसेच टोकावरून फिरत आपण पाच्छापूर कडे उतरणाऱ्या वाटेकडे गेलो की दगडी पायऱ्या दिसतात.



महादरवाजा

सुधागडावरील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती जणू. दोन भव्य बुरुजांनी संरक्षित प्रवेशद्वारावर २ सुंदर कोरलेले शरभ आहेत. तसेच आजही बरेच नक्षीकाम शाबूत आहे. या महादरवाजामध्ये बंदुकिंसाठी जंग्या आहेत. बुरुजावर उभे राहून पुढील घळीतून येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. दरवाजात २ देवड्या आहेत. तसेच चौकटीत खाली पाणी वाहून जायला वाट केली आहे.

हा दरवाजा अर्ध्याहून अधिक मातीखाली गेला होता. १९८७ च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने येथे ३ वर्ष काम करून येथी बहुतांश माती काढली. पण पुन्हा ती साचल्यामुळे ट्रेकक्षितीज संस्थेने दुर्गामित्र, पालीवाला कॉलेज चे विद्यार्थी, निसर्गमित्र तसेच गिरीमित्र प्रतिष्ठान या संस्थांबरोबर २००३ ते २००८ या काळात हे माती पूर्णतः साफ केली. आज हा दरवाजा पूर्ण मोकळा झाला आहे.



महादरवाजा परिसर

महादरवाजा परिसर हा विस्तृत असून येथे तटबंदीच्या बाजूने फिरता येते. डावीकडील बाजूने फिरत गेल्यास आपण झाडाझुडपातून भोराईच्या पाठाराकडे येतो. तसेच उजवीकडील वाट बंद असून ती पूर्व बुरुजाकडे जाऊन मिळते. महादरवाजातून खाली उतरलो की अजून दोन दरवाजे पार करून आपण पुढची वाट उतरतो. इथे खूप पडझड झाली असून एक दरवाजा जवळ जवळ नष्ट झाला आहे.



भोराई मंदिर

सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या देवळापाशी येतो. सुंदर आणि ऐसपैस असलेल्या देवळातील भोराई देवीची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. भोराई देवीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात. नवरात्राच्या जत्रेत तर भाविकांचा ओघ असतो. मंदिरात भली मोठी घंटा आहे. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे, जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे. तसेच मंदिराच्या आवारात जवळ जवळ ३६ वीरगळी आहेत.



शिवमंदिर

वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.



विशाल कोठारे

भोराई मंदिराकडून टकमक टोकाकडे जाताना चार विशाल कोठारे दिसतात. हे नेमके कुठले कोठार असावे याचे उल्लेख आढळत नाही, पण स्थानिकांच्या मते ही धान्य कोठारे आहेत. चारही कोठारे समान आकाराची असून त्यांच्यातले अंतरही सारखे आहे. अंदाजे ५ मी रुंद आणि २३ मी लांब अशी ही कोठारे सर्व बाजूने बंद आहेत, फक्त एका बाजूने द्वार आहे. तर बाहेरील चौथरा १२ मी रुंद आणि ४० मी लांब आहे. दोन कोठारांमधील अंतर अंदाजे ७ मी आहे.



टकमक टोक अथवा बोलते कडे

सुधागड आपण दर्यागावातून चढू लागलो की उजव्या बाजूस कड्याचे टोक दिसते. हे रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसते म्हणून यास टकमक असे नाव आहे. तसेच दर्यागावाकडून येणारी वाट यांच्यामधील घळीत प्रतिध्वनी येतो, म्हणून याला बोलते कडे असेही म्हणतात. येथे भन्नाट वारा वाहतो. तसेच पावसाळ्यात धुक्याच्या वेढ्यात या कड्यावर छान वाटते.



गोमुख असलेले टाके

भोराई मंदिरावरून टकमक कडे जाताना वास्तूंचे अवशेष आढळतात. येथून डावीकडे खाली एक पायवाट उतरते, जी थेट आपल्याला एका मोठ्या टाक्याकडे. इथे आपल्याला एक गोमुख आढळते.



पाच्छापूर कडील बुरुज

पाच्छापूर दरवाजातून आल्यावर फोन मोठे बुरुज दिसतात, एक पाच्छापूर कडे तोंड करणारा आणि दुसरा ठाकूरवाडी कडे नजर ठेवणारा. दोन्ही चिलखती बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत. ठाकूरवाडी कडे तोंड करणाऱ्या बुरुजावरून आपण तो परिसर व्यवस्थित पाहू शकतो.



पूर्वेकडील बुरुज

भोराई मंदिरावरून महादरवाजा कडे जाताना उजवीकडे जंगलात एक छोटीशी पायवाट जाते. काळजीपूर्वक या वाटेचा मागोवा घेत आपण एका तेकाडापाशी पोचतो. हे पूर्वेकडील बाजू असून येथे पुढे चालत आलो की गडावरील सर्वात मोठा बुरुज आपल्याला आढळतो. हा बुरुज घनगड कडे तोंड करून उभा आहे, आणि थोड्या खालच्या टप्प्यावर आहे. काळजी घेतली तर येथे उतरून हा बुरुज नीट पाहता येतो.



चोर वाट

पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो. पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते. तसेच उजवीकडे वळल्यास आपण काही पायऱ्या उतरून सलग तटबंदीवरून चालत अगदी टोकापाशी पोचतो. ट्रेकक्षितीज संस्थेने काही काळ श्रमदान करून येथील पायऱ्या साफ केल्या.



कातळात कोरलेली टाकी

धोंडसे मार्गावरून येताना आपल्याला दोन ठिकाणी सातवाहनकालीन दगडात कोरलेली पाण्याची टाकी आढळतात. पैकी एका टाक्याच्या इकडे कोरलेले सैनिकाचे प्रतिक आहे, ते तानाजी टाके. आणि दुसरे हनुमान टाके. या टाक्यांमधील पाणी स्वच्छ आणि थंडगार आहे.



बांधीव टाकी

गडाचा परिसर विस्तृत आहे, आणि अनेक ठिकाणी आपल्याला बांधीव टाकी दिसतात. पैकी वाड्याच्या जवळ तीन मोठी टाकी असून ती मुख्य पाण्याचा स्त्रोत आहेत. एक टाके ३५ x २५ फूट आहे तर दोन जोडलेली टाकी १५ x २५ फुटाची आहेत. २००८ आणि २००९ साली क्षितीज आणि दुर्गमित्र या संस्थांनी ही २ टाकी पूर्ण साफ केली. पालीवाला महाविद्यालयातील प्राध्यापक सुधीर पुराणिक तसेच पाच्छापूरवासीय श्री भुस्कुटे यांचे बहुमोल सहाय्य लाभले.

या तीन टाक्यांच्या समोर टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजून २ ते ३ टाकी आहेत, जी सुकलेली आहेत. तसेच आपल्याला गुप्त दरवाजा परिसरात २-३ टाकी आढळतात.



पोहोचण्याच्या वाटा :
गडावर पोचण्यास २ वाटा आहेत -

ठाकूरवाडी अथवा दर्यागावातून

पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते. पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या

दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो, हाच पाच्छापूर कडील दरवाजा. येथून आपण १५ मिनिटे चढल्यावर गडमाथ्यावर पोचतो.



धोंडसे गावातून

पालीहून नाडसूर / धोंडसे गावी पोचून आपल्याला येथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोचता येते. इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण येथून चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करत थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वतः करावी. गडावर मोठी भांडी आहेत.
पाण्याची सोय :
वाड्या पासून ५ मिनिटावर ३ मोठी टाकी आहेत. पैकी सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय आहे. उन्हाळ्यात मधल्या टाक्यातले पाणी पिणे सोयीस्कर. पाच्छापूर दरवाज्याजवळ एक टाके आहे. तसेच धोंडसे मार्गावर २ कोरीव टाकी असल्यामुळे गडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. तलावातील पाणी पिऊ नये.
पक्षी :
सुधागडावर माळ टिटवी, कीटक खाणारे हिरवे पक्षी अथवा बी-इटर, हरियल, हळद्या, रॅकेट टेल ड्रोन्गो, गिधाड, इ. पक्षी दिसतात.
सूचना :
सुधागड बद्दल काही महत्वपूर्ण उल्लेख
स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान - अविनाश सोवनी
पंत सचिव हे पद मूलतः "सुरनीस" म्हणून ओळखले जायचे. सुरनीस हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ छत्रपतींनी दिलेल्या सनदा, वराती, हुकुमनामे यावर 'सुर सुद बार' असे शेरे मारणारा. व्यापक राज्यव्यवस्थेत या कामाच्या प्रमुखासच सुरनीस असे म्हणू लागले. राज्याभिषेकाच्या वेळी, पंत सचिव असे नाव देऊन त्या पदावर अण्णाजी दत्तो यांची नेमणूक केली. पंत सचिवांना वर्षाल पाच हजार होन असा पगार असे.

छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने केली म्हणून अण्णाजीना प्रथम सचिवपद काढून कैदेत बसवले, परंतु नंतर मुक्त करून त्यांची पुन्हा सचिवपदी नेमणूक झाली.

त्यानंतर रामचंद्र नीलकंठ हे पंत सचिव झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी भोरप्या गडावरील सबनीस नरो मुकुंद यांच्या मुलाला, शंकरजी नारायण याला पंत सचिव केले. शंकरजी नारायण याने पुढील काळात अतुलनीय पराक्रम करून मोगली सैन्यापासून राज्याचा बचाव केला. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिव पद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते.

इंग्रजी अमदानीत पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.

सुधागड दर्शन - सुरेश पोतदार

श्री भोराई देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशीही नावे आहेत. पुराण काळात भृगु ऋषींचा आश्रम या किल्ल्यावर होता असे सांगितले जाते. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. गुरव, खंडागळे, खोडागळे व सरनाईक ही घराणी भोराई देवस्थानाशी संबंधित आहेत.



शिवकालीन पत्र सार संग्रह - खंड २

पत्र क्र. १४५९

शके १५९३
इ.स. १६७१-७२

तह “प्रतीपाश्चंद्रलेखेव”


जाबिता तह इमारती करणे. सन इसन्नेकारणे इमारती करावयाचा तह केला असें की, गबाळ हुन्नरवंद लावून पैका पावत नाही. हुन्नरवंद गवगवा करिता काम करीत नाहीत. याबद्दल तह केला की, नेमास्तच इमारती करावी - होन. १,७५००० म||| एक लाख पंचाहत्तर हजार होन रास. ५०,००० रायगड, ३५,००० दि|| घरे, २०,००० तळी २ प्रत्येकी १०,०००, गच्ची ५,०००; - किल्ले, १५,०००; तट १०,००० प्रत्येकी - सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड,पुरंधर, राजगड. ५००० प्रत्येकी प्रचंडगड=तोरणा, प्रसिद्धगड, विशालगड, महिमतगड, सुधागड, लोहगड,सबळगड, श्रीवर्धनगड व मनरंजन. ३००० कोरीगड, २००० सारसगड व महीधरगड, १००० मनोहरगड, ७००० किरकोळ. एकूण १,७५०००.

येणेप्रमाणे एक लाख पंचाहत्तर हजार होन खर्च करणे. मोर्तब सूद. दस्तुर राजेश्री पंत म्हणून संग्रह केला. (मर्यादेय विराजते.)
जिल्हा Raigad
 अवचितगड (Avchitgad)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  बिरवाडी (Birwadi)
 चांभारगड (Chambhargad)  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  कुलाबा किल्ला (Colaba)
 दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  द्रोणागिरी (Dronagiri)  घारापुरी (Gharapuri)
 घोसाळगड (Ghosalgad)  हिराकोट (Hirakot)  ईरशाळ (Irshalgad)  जंजिरा (Janjira)
 कर्नाळा (Karnala)  खांदेरी (Khanderi)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोकणदिवा (Kokandiva)
 कोंढवी (Kondhavi)  कोर्लई (Korlai)  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लिंगाणा (Lingana)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  माणिकगड (Manikgad)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 मृगगड (Mrugagad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पालगड (Palgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पेब (विकटगड) (Peb)  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))
 प्रबळगड (Prabalgad)  रायगड (Raigad)  रामदरणे (Ramdarne)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रेवदंडा (Revdanda)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सांकशीचा किल्ला (Sankshi)
 सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  शिवथरघळ (Shivtharghal)  सोंडाई (Sondai)
 सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  सुरगड (Surgad)  तळगड (Talgad)
 तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))  उंदेरी (Underi)