मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पेब (विकटगड) (Peb) किल्ल्याची ऊंची :  2100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.


Peb (Vikatgad)
42 Photos available for this fort
Peb
Peb
Peb
इतिहास :
या किल्ल्याचे मूळ नाव "पेब" हे नाव पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
पहाण्याची ठिकाणे :
पेबचा किल्ला नेरळ किंवा पनवेल मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत साधारणत: १०० जण राहु शकतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेत खालच्या बाजूला एक माणूस बसू शकेल इतकी छोटी खोली आहे. मोठ्या गुहेच्या वरच्या बाजूस सुध्दा अशाच प्रकारच्या गुहा आहेत. त्यापैकी शेवटच्या गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. ( मोती गुहा सोडून इतर सर्व गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे.)

या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात.पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर चढून उजव्या हाताला वळल्यावर वास्तुंचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण दत्तमंदिरा/ आश्रमा जवळ पोहोचतो. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे. ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत. येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी , पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो.

पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. माथेरान मार्गे गडावर येतांना आपण या बुरुजा खालून येते. बुरुज पाहून परत दत्तमंदिरा जवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ २ पाण्याच्या कोरडी टाकं आहेत. या टाक्र्‍यांच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळ किंवा पनवेलला जाता येते किंवा बुरुजा खालच्या वाटेने माथेरान - नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) नेरळ मार्गे :-
पेबला जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील नेरळ स्टेशनला उतरावे. नेरळ स्टेशनवर उतरल्यावर, समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. स्टेशनच्या बाहेर आल्यावर माथेरानच्या दिशेला न जाता उजवीकडची (मुंबईच्या दिशेची ) वाट पकडावी. या वाटेने डोंगराच्या दिशेने जाताना प्रथम ओढ्यावरील पुल, मग मैदान, पोल्ट्रीफार्म या मार्गे आपण १५ मिनीटात कातकरवाडीत पोहोचतो. येथे मुख्य रस्ता सोडून समोर दिसणार्‍या इलेक्ट्रीकच्या टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला ३ वाटा लागतात.
१) धबधब्याला लागून असलेली वाट
२) मधून गेलेली मुख्य वाट
३) टॉवर्सला लागून असलेली वाट

या तीन वाटांपैकी मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते पण पुढे या वाटेने जाणे अशक्य आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधून जाणारी वाट पकडावी या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे. हीच वाट पुढे झर्‍या,ची होत असली तरी, ही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. या खिंडीत पनवेलहून येणारी वाट येउन मिळते. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार्‍र्‍यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे. किल्ला चढण्यास दोन ते तीन तास लागतात.

२) माथेरान - नेरळ रस्ता मार्गे :-
माथेरान - नेरळ रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर " वाटर पाईप " स्टेशन आहे. या स्टेशन नंतर रेल्वे लाईन रस्त्याला जिथे आडवी जाते, तिथे " पेब (विकटगड) / प्रती गिरनार " ला जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे. येथ पर्यंत एसटी किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते. या ठिकाणाहून रेल्वे मार्गाने चालायला सूरुवात केल्यावर थोड्याच वेळात डाव्या हाताला वरच्या बाजूस " माथेरानचा पॆनोरमा पाँईंट" दिसायला लागतो. पुढे वळसा घेऊन रेल्वे लाईन एका खिंडीत पोहोचते. ही खिंड पार केल्यावर उजव्या बाजूस पेब किल्ला दिसतो.थोडे अंतर चालल्यावर उजव्या बाजूला लोखंडाची भगव्या रंगाची कमान दिसते. रस्त्यापासून कमानी पर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. कमानीतून खाली उतरण्याकरीता पायर्‍या आहेत. या पायर्‍या उतरल्यावर पहीली शिडी लागते. शिडी उतरल्यावर वाट डोंगराच्या कडेकडेने पेब व माथेरानचा डोंगर र्‍यांच्या मधील खिंडीत येते. येथून समोर गडावरील एकमेव बुरुज दिसतो. पुढे दुसर्‍या शिडी जवळ कातळभिंतीत एक नेढ आहे. ही शिडी चढल्यावर आपण महादेवाचे मंदिराजवळील पाण्याच्या टाक्र्‍यांपाशी पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास १.३० ते २ तास लागतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर गुहेमध्ये ५० जणांच्या राहाण्याची सोय होते. पण रात्री येथे उंदरांचा फार त्रास होतो.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी
पाण्याची सोय :
१) मोठ्या गुहेजवळील शिडी जवळ असलेले पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे.
२) महादेव मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) नेरळ मार्गे, पायथ्यापासून ३ तास लागतात. २) माथेरान - नेरळ रस्ता मार्गे १.३० ते २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: P
 पाबरगड (Pabargad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पदरगड (Padargad)
 पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पालचा किल्ला (Pal Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)
 पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारडी किल्ला (Pardi Fort)  पारगड (Pargad)
 पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पारोळा (Parola)  पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)
 पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))
 पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळा (Pimpla)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  प्रबळगड (Prabalgad)  प्रचितगड (Prachitgad)
 प्रतापगड (Pratapgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)