पिसोळ किल्ला
(Pisol) |
किल्ल्याची ऊंची : 
3500 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: गाळणा टेकड्या |
जिल्हा : नाशिक |
श्रेणी : मध्यम |
नाशिकच्या उत्तरेस बागलाण विभागात सेलबारी - डोलबारी रांगेच्या मागे एक डोंगररांग आहे, त्यांचे नाव ‘‘गाळणा टेकड्या’’. पिसोळ, डेरमाळ, गाळणा आणि कंक्राळा हे या गाळणा टेकड्यांच्या रांगेमध्ये येणारे किल्ले आहेत. पिसोळ किल्ला पाहिला की प्रथमदर्शनी त्याच्या उजव्या बाजूच्या कातळात असलेली मोठी खाच आणि त्याच्या बाजूचा बुरुज लक्ष वेधून घेतो. मुख्य डोंगररांगेपासून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी ही मानव निर्मित खाच कातळात खोदलेली आहे. हेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे. मंदिरासमोर झाडाखाली काही मुर्ती शेंदुर लावून ठेवलेल्या आहेत. किल्ला चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात पायवाटेच्या डाव्या बाजूला पाण्याचे दोन कातळात खोदलेली टाकी दिसतात. याठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. टाकी पाहून परत पायवाटेवर येऊन किल्ला चढायला सुरुवात केल्यावर साधारण पणे पाऊण तासात आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तटबंदी, ही चार स्तरांवर एकमेकांना समांतर अशी उभारली आहे. यामुळे खिंडीला आपोआपच संरक्षण मिळाले आहे. पहिल्या दरवाजाच्या डावीकडच्या तटबंदीमध्ये एक बुरुज अजुनही तग धरुन उभा आहे. थोडेसे वर गेल्यावर किल्ल्याचा दुसरा ढासळलेला दरवाजा लागतो. उजवीकडे तटबंदी सुध्दा आहे येथून "यू" आकाराचे वळण घेतले की, तिसरा दरवाजा लागतो. इथून उजवीकडे किल्ल्याच्या उजव्या कड्याच्या जवळ वाट जाते. इथे कड्यात खोदलेल्या दोन गुहा आहेत. एका गुहेत पाणी आहे, तर एक गुहा मुक्कामास योग्य अशी आहे. गुहेच्या समोरच एक दरवाजा आहे. येथून कड्याला डावीकडे ठेवत जाणारी वाट डेरमाळकडे जाते. पण आपण गुहा पाहून तिसर्या दरवाज्यापाशी यायचे. दरवाज्यातून डावीकडे वळल्यावर सुध्दा कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. या गुहा खूप खोल आहेत. सध्या तिथे वटवाघूळांची गर्दी खूप झाली आहे. एका गुहेत पाणी सुध्दा आहे. गुहा पाहून पुढे चढणीला लागायचे पुन्हा रस्ता इंग्रजी "यू" आकाराचे वळण घेऊन चौथ्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. इथेच उजवीकडे आणि डावीकडे बुरुज आहे. डावीकडे कड्यामध्ये तीन गुहा आहेत. या गुहांमध्ये पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मधल्या गुहेच्या समोरच एक नंदी आहे. मात्र शंकराची पिंड पाण्याखाली आसल्यामुळे दिसत नाही. या टाक्यातील पाणी बाटल्यांमंध्ये भरुन घेऊन परत पायवाटेवर येऊन पाच मिनिटे चढून गेल्यावर आपण खिंडीतून गडमाथ्यावर पोहोचतो. माथ्यावर पोहचल्यावर किल्ल्याचा खरा घेरा आपल्याला समजतो. किल्ल्याला तिन्ही बाजूला पठार आहे. आपण प्रथम डावीकडे वळायचे आणि माथा चढायला लागायचे. थोड्या (चार - पाच) पायर्या चढून गेल्यावर जमिनीत कातळात खोदलेली पाण्याची दोन टाकी आहेत. पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. टाक्यांच्या वरच्या बाजूस उजवीकडे कमान असलेली एक भिंत उभी आहे. गडावरील उंच भागात बांधलेल्या वाड्याची ही एकच भिंत आज उभी आहे. वाड्याच्या कमानीवर कमलपुष्पे कोरलेली आहेत. आतील चौथर्याचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. वाड्याच्या आत झाडी माजलेली आहे. त्यात वाड्याचे अवषेश लपलेले आहेत. वाडा पाहून डावीकडे गेल्यावर मशिद आहे. मशिदीत एक दगडी मुर्ती आहे. पण पूर्णपणे झिजल्यामुळे ती ओळखण्या पलिकडे गेलेली आहे. मशिदीच्या मागून एक वाट किल्ल्याच्या टोकाला जाते. या वाटेवर काही घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आहेत, मध्येच पाण्याची एक दोन टाकी सुध्दा आहेत. या टाक्यांमधील पाणी मात्र खराब आहे. हे सर्व पाहून परत मशिदीपाशी येऊन किल्ल्याच्या दरवाजाच्या दिशेने खाली उतरायला सुरुवात करावी वाटेत उघड्यावर हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती आहे.
हनुमान आणि गणेशाचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन समोरच्या दिशेला (दरवाजाच्या बरोबर विरुध्द दिशेला असणार्या) खिंडीपर्यंत जायचे. ही जागा म्हणजे आपण ज्या वाटेने आलो त्याच्या एकदम विरुध्द बाजूला असणारी जागा. या खिंडीत काही तटबंदीचे अवशेष आहेत. शिवाय पडक्या दरवाजाचे अवशेषही आहेत, पण ही वाट मोडकळीस आल्याने आता वापरात नाही. त्यामुळे हे सर्व लांबून पाहून आपला मोहरा उजव्या बाजूच्या पठाराकडे वळवायचा. या पठारावर काही झाडे आहेत. त्या दिशेने चालत गेल्यावर तिथे एक मोठे पूर्णपणे सुकलेले तळे पाहायला मिळते. ते पाहून शेवटच्या टोकाच्या दिशेने निघायचे. वाटेत उजव्या बाजूला पिंड आणि काही कोरीवकाम असलेले दगड ठेवलेले आहेत. मंदिर पाहून पुढे गेल्यावर तळ्याच्या टोकाला एका समाधीचे अवशेष आहेत. या अवशेषात दोन मोरांची शिल्प, दगडावर कोरलेले कमळ आणि पिंड आहे. या समाधीच्या बाजूने दगडाचे छोटेसे कुंपण बनवलेले आहे. या चौथर्याच्या थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. या टाक्यातील पाणी खराब आहे. त्याच्या थोडेसे पुढे एक सुकलेले तळे आहे. इथून किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यास ५ मिनीटे लागतात. शेवटच्या टोकाला एक बुरुज आहे. त्या बुरुजामध्येच एक टेहळणीसाठी खिडकी ठेवलेली आहे. समोरचा डोंगर आणि किल्ल्याच्या मध्ये बरोबर धोडपच्या माची सारखी खाच आहे. ही खाच मानव निर्मित असून त्यात उतरण्यासाठी खोबणी केलेल्या आहेत. किल्ल्याचा तटा बुरुजाने संरक्षित केला आहे. पण किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराच्या याभागातून शत्रूने हल्ला करु नये यासाठी अडथळा म्हणून या खाचेची निर्मिती करण्यात आली होती. खाचेच्या पलिकडील बाजूस असलेल्या डोंगरावर टेहळणीसाठी बसणार्या सैनिंकंसाठी बनवलेले चौथरे आणि कारळातील खळगे (पॉटहोल्स) पाहायला मिळतात. याठिकिल्ल्यावरुन डेरमाळच्या भैरवकड्याचे खूप छान दर्शन होते. एका बाजूला मांगी तुंगीचे सुळके दिसतात. संपूर्ण गड फिरण्यास तीन तास लागतात.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
पिसोळला जायचे असल्यास नाशिक - सटाणा मार्गे ‘ताहराबाद’ गाठायचे. नाशिक पासून ताहराबाद १०५ किमीवर आहे. ताहराबाद - मालेगाव रस्त्यावर ताहराबाद पासून ८ किमीवर "जायखेडा" नावाचे गाव आहे. ताहराबाद पासून जायखेड्याला जाण्यास एसटी किंवा सहा आसनी गाड्या मिळतात. जायखेड्या पासून "वाडी पिसोळ" पर्यंत ५ किमीचा रस्ता आहे. जायखेड्या पासून वाडी पिसोळ पर्यंत सहा आसनी गाड्या मिळतात. जर गाडी नाही मिळाली तर आपली पायगाडी चालू ठेवायची. पिसोळवाडी मधून किल्ल्याच्या दिशेला निघाल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचे मंदिर आहे. खाजगी वहानाने या मंदिरापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या समोर उभे राहील्यावर उजव्या बाजूला डोंगरातील खाच आणि डाव्या बाजूला झाडीने भरलेली खिंड दिसते. मंदिरापासून मळलेल्या पायवाटेने या खिंडीत षिरायचे. मंदिरा पासून निघाल्यावर सुमारे पाऊण तासानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दारापाशी येऊन पोहोचतो.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्याच्या दुसर्या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये ५ ते १० जणांना रहाता येते. |
जेवणाची सोय : |
जेवणाची सोय स्वत:च करावी |
पाण्याची सोय : |
किल्ल्याच्या दुसर्या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. खिंडीच्या जवळ डावीकडच्या गुहेमध्ये सुध्दा पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
वाडी पिसोळ मार्गे १ तास लागतो. |