पिंपळास कोट
(Pimplas Kot) |
किल्ल्याची ऊंची : 
50 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : ठाणे |
श्रेणी : सोपी |
लोणावळाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणारी उल्हास नदी वसई जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीवरील कल्याण हे प्राचीन बंदर आहे. कल्याण बंदरातून माल विविध घाट मार्गांनी घाटावरील बाजारपेठां मध्ये जात असे. उल्हास खाडीतून कल्याण पर्यंत जाणार्या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी, त्यावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले, चौक्या उल्हास खाडीच्या आसपास बांधलेल्या दिसतात. त्यापैकी खाडी मुखावर असलेला वसई किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, नागला बंदर किल्ला, गायमुख किल्ला, पिंपळास किल्ला (चौकी) कल्याणचा दुर्गाडी किल्ला असे अनेक किल्ले, चौक्या वेगवेगळ्या काळात, राजवटीत बांधले गेले. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
उल्हास नदी (खाडी) "S" आकाराचे वळण घेते त्या ठिकाणी खाडीच्या दक्षिणेला डोंबिवली तर उत्तरेला पिंपळास गाव आहे. पिंपळास गावातील टेकडीवर पिंपळासचा किल्ला आहे. पिंपळास किल्ला असा जरी याचा उल्लेख होत असला तरी ही केवळ एक टेहळणी चौकीची जागा असावी. या टेकडीच्या खाली पिंपळास गावाची वस्ती आहे. गावातील लोक या टेकडीला किल्ला आणि कापरीदेव या दोन्ही नावावे ओळखतात. वस्तीतून असलेल्या पायवाटेने १० मिनिटात आपण टेकडीवर पोहोचतो. संपूर्ण टेकडी दाट झाडीने झाकलेली आहे. त्या झाडीतून दक्षिणेला दूरवर खाडी दिसते. टेकडीवर एक वास्तू आहे. त्या वास्तूची उंची अंदाजे २० फ़ूट आहे. हि वास्तू एक मजली असावी कारण वास्तूच्या भिंतीत वासे बसवण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात. वास्तूचे छप्पर अस्तित्वात नाही. या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच असलेल्या अर्धवर्तुळाकार कमान असलेल्या कोनाड्यात शेंदुर लावलेले काही दगड ठेवलेले आहेत त्यांना कापरी देव म्हणतात. टेकडीवर पाण्याची व्यवस्था दिसत नाही . तसेच तटबंदी किंवा संरक्षणाची कोणतीही व्यवस्था दिसत नाही. |
पोहोचण्याच्या वाटा : |
पिंपळास गाव ठाणे - कल्याण (मुंबई - आग्रा) महामार्गावर आहे . कल्याणहून ठाण्याकडे जातांना पिंपळास ११ किलोमीटर अंतरावर आहे, तर ठाण्याहून कल्याणकडे येतांना १५ किलोमीटर अंतरावर आहे. महामार्गावर पिंपळास गावात जाणारा फ़ाटा आहे. पिंपळास गावातील चौकातून एक रस्ता पिंपळास कोट किंवा कापरी देव टेकडीकडे जातो. या रस्त्यावर वस्तीत म्हात्रे (पहेलवान) यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला दाट वस्तीतून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.
डोंबिवली पश्चिमेकडून रेतीबंदर वरुन वेल्हा गावात जाण्यासाठी बोट सेवा आहे. वेल्हे जेटी वरुन ३ किलोमीटरवर पिंपळास कोट आहे. डोंबिवली पश्चिमे वरुन सर्वात जवळचा मार्ग म्हणजे दिवा वसई रेल्वे लाईनवर असलेला सातपूल. हा पूल ओलांडून एक किलोमीटरवर पिंपळास कोट (कापरी देव) आहे. या दोन्ही मार्गांनी जातांना आपण पिंपळास गावात जात नाही. गावाच्या बाहेर टेकडीच्या खाली स्मशान आहे. त्याला लागूनच टेकडीवर जाणारी पाऊलवाट आहे.
|
राहाण्याची सोय : |
गडावरील राहाण्याची सोय नाही. |
जेवणाची सोय : |
गडावर आणि गावात जेवणाची सोय नाही. |
पाण्याची सोय : |
गडावर पिण्याचे पाणी नाही. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
पिंपळास गावातून १० मिनिटे. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |